पुनर्वसन होणाऱ्या गावात शाळा बांधकाम कशाला ?
By Admin | Updated: May 17, 2015 01:35 IST2015-05-17T01:35:12+5:302015-05-17T01:35:12+5:30
सिनाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत सिनाळा, नवेगाव, मसाळा (जुना) या तिन्ही गावाचे दुर्गापूर वाढीव खुल्या कोळसा खाणीसाठी पुनर्वसन होणार असून आहे.

पुनर्वसन होणाऱ्या गावात शाळा बांधकाम कशाला ?
चंद्रपूर : सिनाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत सिनाळा, नवेगाव, मसाळा (जुना) या तिन्ही गावाचे दुर्गापूर वाढीव खुल्या कोळसा खाणीसाठी पुनर्वसन होणार असून आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत नवेगाव येथे शाळेचे बांधकाम करण्यात येत आहे. सिनाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या तिन्ही गावाचे पुनर्वसन होणार असल्यामुळे शासनाने या गावातील सर्व योजना बंद केल्या असताना गावात शाळेचे बांधकाम कसे काय करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्ग सेलचे महेंद्र मेश्राम यांनी म्हटले आहे.
या कामाला स्थगीती देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आही. येथे होत असलेले शाळा इमारतीचे बांधकाम हा पैशाचा दुरूपयोग असून सत्ता उपभोगणाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असे मेश्राम यांनी म्हटले आहे.
सिनाळा, नवेगाव, मसाळा (जुना) या तिन्ही गावाचा टी.एल.आर. सर्व्हे उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय चंद्रपूरकडून झालेला आहे. वेकोलिने या तिन्ही गावाच्या पुनर्वसनाकरिता कोयना गेट, सबेरिया आॅफीस पद्मापूरच्या बाजुला जागा आरक्षित केली आहे. त्याचा फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे. पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे शासनाने या गावातील सर्व नविन योजना बंद केल्या आहेत. शासनाचे कोणतेही बांधकाम या ग्रामपंचायतीच्या हद्दीत होताना दिसत नाही. परंतु, नवेगाव येथे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळेचे बांधकाम करण्यात येत आहे, याकडे लक्ष द्यावे. (स्थानिक प्रतिनिधी)