मिनी विधानसभा निवडणूक कोण जिंकणार ?
By Admin | Updated: November 18, 2016 01:10 IST2016-11-18T01:10:18+5:302016-11-18T01:10:18+5:30
बल्लारपूर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी राखीव करण्यात आले.

मिनी विधानसभा निवडणूक कोण जिंकणार ?
बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : भाजपाला शिवसेनेची तर काँग्रेसला बंडखोरांची अडचण
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
बल्लारपूर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी राखीव करण्यात आले. नगराध्यक्षपदाची निवडणूक यावर्षी थेट मतदारांतून करण्यात येत आहे. यामुळे निवडणुकीला मिनी विधानसभा निवडणुकीचे स्वरुप आले आहे.
येथे अध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस, भाजपासह अन्य राजकीय पक्षाच्या उमेदवारासह १४ उमेदवार लढवित आहेत. या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला शिवसेना उमेदवाराची तर काँग्रेसला बंडखोर उमेदवाराची अडचण निर्माण झाली असून मिनी विधानसभा निवडणूक कोण जिंकणार, असा अंदाज मतदारात वर्तविला जात आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच येथील नगराध्यक्ष पदाची निवड मतदार मतदानाच्या माध्यमातून करणार आहेत. येथील नगरपरिषदेला ‘ब’ वर्गाचा दर्जा असून जिल्ह्यात सर्वात मोठी पालिका म्हणून ओळखली जाते. यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे येथील निवडणुकीवर लक्ष लागले आहे. येथील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी दोन्ही पक्षासाठी अन्य पक्षाच्या उमेदवारांमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशातच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने हजार व पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्याने उमेदवारांवर खर्चाचे सावट उभे झाले आहे.
येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदाची निवडणूक भाजपाचे उमेदवार हरिश शर्मा, काँग्रेसचे व्यंकटेश एम. बालबरैय्या, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे व बंडखोर उमेदवार नासीर खान, शिवसेनेचे उमेदवार विनोद उर्फ सिक्की यादव, बीआरएसपीचे उमेदवार राजू झोडे, बसपाचे मारोती सोमकुंवर, भारिप बहुजन महासंघाचे उमेश कडू, राष्ट्रवादीचे अल्ताफ हाजी युनुस, शेख अब्दुल, किशोर पुसलवार, सुनील सोनुले, शेख अब्बास युसूफ व भारत थुलकर यांच्यात लढली जात आहे. यासोबतच आरपीआरच्या वंदना चव्हाण एकमेव महिला उमेदवार म्हणून अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत.
यातील भाजपाचे हरिश शर्मा, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नासीर खान, शिवसेनेचे विनोद उर्फ सिक्की यादव, बीआरएसपीचे राजू झोडे हे विद्यमान नगरसेवक असून आताच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मतदारांना मतासाठी आर्जव करीत आहेत. तर अपक्षातील भारत थुलकर व शेख अब्बास यांनी माजी नगरसेवक पदाचा अनुभव घेत अध्यक्षपदासाठी लढत देत आहेत.
यावेळच्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत एका मतदाराला अध्यक्षपदाच्या उमेदवारासह एका प्रभागातून दोन असे एकूण तीन उमेदवारांना एकाच वेळी मतदानाची संधी मिळाली आहे. यामुळे येथील मिनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. येथील ८४ हजार ५२२ मतदार अध्यक्षासह १६ प्रभागातील ३२ उमेदवारांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करणार आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून हळूहळू प्रचाराला वेग येत आहे. येथील निवडणुकीत नव्याने नोंदणी झालेले १ हजार ९५४ मतदार पहिल्यांदाच नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत, हे विशेष!
अध्यक्षपदासाठी मराठी व अमराठी उमेदवारीत संभ्रम
बल्लारपूर नगरपरिषद जिल्ह्यात सर्वात मोठी आहे. बल्लारपूर औद्योगिक शहर असल्याने सर्वच जाती, धर्म, पंथाच्या नागरिक येथे गुण्यागोविंदाने वास्तव्याला आहेत. दक्षिण भारताला जोडणाऱ्या शहराची मतदार संख्या ८४ हजार ५२२ असून यात ४३ हजार ६५९ पुरुष व ४० हजार ८६० महिला मतदारांचा समावेश आहे. येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून राजकीय पक्षांचे हिंदी व तेलगू भाषक उमेदवाराला संधी दिल्यामुळे मराठी भाषीक मतदारात काहीशी नाराजी दिसून येत आहे. परिणामी येथील निवडणुकीला प्रांतीय स्वरुप निर्माण झाल्याचे प्रचारातून दिसून येत आहे. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मराठी व अमराठी उमेदवारांसदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.