तर अपघातग्रस्तांना कोण मदत करणार ?

By Admin | Updated: March 26, 2015 00:59 IST2015-03-26T00:59:21+5:302015-03-26T00:59:21+5:30

सज्जनाचा पुरस्कार आणि दुर्जनांचा धिक्कार, हे पोलीस खात्याचे ब्रीद. पोलीस प्रशासन जनतेचे मित्र, अशी समाजात प्रतिमा.

Who will help the victims? | तर अपघातग्रस्तांना कोण मदत करणार ?

तर अपघातग्रस्तांना कोण मदत करणार ?

संतोष मेश्राम चिचपल्ली
सज्जनाचा पुरस्कार आणि दुर्जनांचा धिक्कार, हे पोलीस खात्याचे ब्रीद. पोलीस प्रशासन जनतेचे मित्र, अशी समाजात प्रतिमा. परंतु चिचपल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभागामार्फत झालेली कारवाई मात्र अन्यायकारक असल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळून येत आहे. झालेल्या प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा समाजात मलीन झालेली आहे.
झाले असे की चंद्रपूर - मूल मार्गावर एक ट्रक सिमेंट बॅग भरून रायपूरला निघाला होता. चिचपल्ली गावाजवळ विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे वाहनावरील संतुलन बिघडले. त्यात रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाला. त्यात जवळपास पाचशे सिमेंटचे बॅग्स होते. रस्त्याच्या कडेला गोंडसावरी येथील छत्रपती रामचंद्र घाटे हे आपली दुचाकी रस्त्याचा बाजुला उभी करून मोबाईलवर बोलत होते. झालेल्या अपघातामुळे ट्रकमधील सिमेंट बॅग त्यांच्या अंगावर पडल्याने तो त्यात पूर्णपणे दबला गेला. उपस्थित जनसमुदायांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला बाहेर काढले. तो मृत्यूशी झुंज देत होता. नागरिकांनी समयसुचकता दाखवित तात्काळ त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. शेवटी मृत्यूचाच विजय झाला. हतबल झालेले नागरिक मृतदेह घेऊन घटनास्थळावर दाखल झाले आणि पोलीस यंत्रणेचे वाट बघू लागले. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. परंतु वेळेवर कोणीही हजर होऊ शकले नाही. जवळपास दोन ते तीन तासांनी रामनगर येथील पोलीस आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरूद्धात नारेबाजी केली. जोपर्यंत मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका मृताच्या परिवारासह नागरिकांनी घेतल्यामुळे पेच निर्माण झाला. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करावयाची होती. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करीत मृताच्या पत्नी व वडिलाला अमानुषपणे मारहाण करीत मृतदेह ताब्यात घेतला. त्यामुळे उपस्थितांनी नारेबाजी केली. त्यामुळे भांबावलेल्या पोलिसांनी अनेकांना दंगा नियंत्रण पथकाद्वारे बदलून काढले.
या सर्व घटनेची एका युवकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकार्डिंग केली. आपले दुष्कृत्य चव्हाट्यावर येणार, या भीतीपोटी पोलिसांनी त्या युवकाचा पाठलाग करून त्याचा मोबाईल ताब्यात घेतला व उपस्थित असलेल्या व सहकार्य करणाऱ्या १९ व्यक्तीवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले.
त्याची रात्रीच्या सुमारास धरपकड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिकामध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकरवी होत असलेल्या अत्याचारामुळे जनमाणसात असंतोष खदखदत असून भविष्यात एखादी असा प्रसंग उद्भवला तर मदतनीस म्हणून कोण पुढे जाणार, असा सुर सध्यातरी चिचपल्ली परिसरात उघडपणे व्यक्त होत आहे.

Web Title: Who will help the victims?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.