‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरव होताना
By Admin | Updated: September 20, 2016 00:43 IST2016-09-20T00:43:14+5:302016-09-20T00:43:14+5:30
‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरवांकित होत असताना राज्यात १ जुलै २०१६ रोजी लोकसहभागातून...

‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरव होताना
लिम्का बूक आॅफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळणे आनंदाचे
जेसीआयतर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा ‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्काराने सन्मान
चंद्रपूर : ‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरवांकित होत असताना राज्यात १ जुलै २०१६ रोजी लोकसहभागातून लावण्यात आलेल्या २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची नोंद घेतल्याचे लिम्का बूक आॅफ रेकॉर्डचे प्रमाणपत्रही आजच मिळाले. या दोन्ही गोष्टी खुप आनंददायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाईन्स (जेसी) च्या वतीने रविवारी पद्मविभूषण डॉ. बी. के गोयल यांच्या हस्ते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘उमन आॅफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशन लि. च्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, पद्मश्री डॉ. उज्ज्वल निकम, जेसीचे फाऊंडर चेअरमन जीवराज शहा, इंदर जैन, प्रेम लुनावत यांच्यासह जेसीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात डॉ. सुजाता वासानी आणि डॉ. अमित कुमार शर्मा यांना ‘आऊटस्टॅण्डिंग यंग पर्सन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
याआधी ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल तर्फे स्व. प्रमोद महाजन, स्व. आर आर पाटील, महानायक अमिताभ बच्चन, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे , केंद्रीच मंत्री नितिन गडकरी यांना सन्मानित करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वृक्ष लावणे प्रत्येकाच्या जीवनाचे कर्तव्य झाले पाहिजे
वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ लाख ५२ हजार लोकांच्यावतीने आपण हा पुरस्कार स्वीकारतो, असे सांगत ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, माणसाला श्वासांसाठी लागणारा आॅक्सीजन झाडांपासूनच मिळत असल्याने वृक्ष लावणे हे प्रत्येकाच्या जीवनाचे कर्तव्य झाले पाहिजे. येत्या तीन वर्षात राज्यात ५० कोटी झाड लावण्याचा शासनाचा संकल्प असून येणाऱ्या १ जुलै २०१७ च्या ३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जेसीनेही सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वत: कमवलेले पैसे स्वत:साठी खर्च करणे हा माणसाचा स्वभाव असतो. परंतु, स्वत: कमवलेले पैसे समाजासाठी खर्च करणे ही भारतीयांची संस्कृती आहे आणि जेसी ही संस्कृती पुढे नेत असल्याचेही त्यांनी सांगितले.