गृह अलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा जातो कुठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:25+5:302021-04-19T04:25:25+5:30
चंद्रपूर : सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. घरी राहणाऱ्या या रुग्णांचे मास्क, त्यांनी वापरलेले इतर ...

गृह अलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा जातो कुठे
चंद्रपूर : सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. घरी राहणाऱ्या या रुग्णांचे मास्क, त्यांनी वापरलेले इतर टाकाऊ पदार्थ व वस्तूंच्या कचऱ्याचे विलगीकरण करून संकलन करण्याची स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, त्यासंदर्भाने फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे या रुग्णांच्या माध्यमातून पुन्हा कोरोना पसरण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर शहरात मनपाच्या घंटागाडीतून कचऱ्याचे संकलन करण्यात येते. नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतीमध्येसुद्धा कचरा संकलित करण्याची व्यवस्था केली आहे. चंद्रपूर शहरात अनेक रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. या कुटुंबातील कचरासुद्धा घंटागाडीच्या माध्यमातूनच गोळा करण्यात येत आहे; परंतु कोरोनाचा प्रतिबंध करताना कोरोनाबाधित रुग्णांकडून तयार होणाऱ्या कचऱ्याचीही योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. बाधित रुग्णांचे सॅनिटायझर, मास्क व इतर कचरा स्वतंत्ररित्या बायोमेडिकल वेस्ट म्हणून संकलित करण्याची गरज आहे. तेव्हा या संदर्भाने प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे.
बॉक्स
कचऱ्यातून कोरोना पसरू शकतो का?
कचऱ्याचे योग्य पद्धतीने संकलन झाले नाही तर कचऱ्यापासून कोरोना पसरू शकतो, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कचऱ्याचे संकलन करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी वापरलेले कपडे, मास्क आणि इतर कचरा हा बायोमेडिकल वेस्ट असून, या कचऱ्याचे शासकीय पद्धतीने संकलन करणे गरजेचे आहे.
कोट
गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांच्या घरातील कचऱ्याचे विलगीकरण वेगळ्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्या संदर्भात विचार सुरू असून, लवकरच तशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
- राजेश मोहिते, मनपा आयुक्त, चंद्रपूर