कोरपना तालुक्यातील रस्त्यांचे भोग कधी संपणार ?
By Admin | Updated: October 7, 2015 02:11 IST2015-10-07T02:11:15+5:302015-10-07T02:11:15+5:30
औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

कोरपना तालुक्यातील रस्त्यांचे भोग कधी संपणार ?
नांदाफाटा : औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्त्यांचा भोग कधी संपणार अशी संतापजनक प्रतिक्रिया आता नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे.
तालुक्यातील गडचांदूर-भोयगाव, गडचांदूर-कोरपना, गडचांदूर-वनोजा-वणी, कोरपना-कोडशी-वणी, कोरपना-आदिलाबाद, गडचांदूर -देवाडा आदी मुख्य रस्ते खड्यांनी वेढलेले दिसत आहे. या आधीही सदर रस्त्यांच्या डागडुजी आणि दुरुस्तीसाठी कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, निधी खर्च होऊनही रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. यातच पोचमार्गाचीही अवस्था अत्यंत बिकट असून गेल्या दहा वर्षापासून अनेक पोचमार्ग डांबरीकरणाविनाच आहे. यामध्ये नांदा-लालगुडा, बाखर्डी-नांदा, बाखर्डी-निमनी-गोवरी, कढोली-आवारपूर-वनोजा, नांदाफाटा -पिंपळगाव तथा कोरपना परिसरातील अनेक मार्गाची अवस्था बिकट आहे.
याआधी बऱ्याच लोकप्रतिनिधींनी कोटी रुपये खर्च झाल्याचा गाजावाजा केला. काही ठिकाणी विकासाचे मोठ-मोठे फलकही लावण्यात आले. परंतु, तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न आजही कायम दिसत आहे. याचाच परिणाम औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागात अधिक होत आहे.
नांदाफाटा-नारंडा-वनसडी-अंबुजा, माणिकगड नजीक मुख्य रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना यापूर्वी जीवही गमवावा लागला आहे. तेव्हा आता तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल का, असा प्रश्न नागरिक प्रशासनाला विचारत आहे. (वार्ताहर)
एकाच कंत्राटदाराला पाच ते सहा कामे
तालुक्यातील अनेक गावात १३ व्या वित्त आयोग योजनेतील कामे अद्यापही अपूर्ण आहेत. यामध्ये बांधकाम विभागातील अभियंता व अधिकारी काही कंत्राटदारांना हाताशी धरुन कामे करीत असल्याचे समजते. दुसरीकडे कामे करीत असलेल्या कंत्राटदाराचे काम मध्येच बंद करून आपल्या नजीकच्या कंत्राटदाराकडे कामाचा कंत्राट दिला जात आहे. त्यामुळे एकच कंत्राटदार पाच ते सहा गावाची कामे करताना दिसत आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष
तालुक्यात चार सिमेंट कंपन्या असल्याने दर दिवशी हजारो चार-चाकी वाहने मुख्य रस्त्यावरुन ये-जा करतात. यातील अनेक वाहने ओव्हरलोड असल्यानेही रस्त्यांची अवस्था बिकट होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे.
आंदोलनाचा इशारा
तालुक्यातील मार्गाची दुरुस्ती न झाल्यास येत्या पंधरा दिवसात आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी प्रभाकर दिवे, मदन सातपूते, गजानन पंधरे, आशिष मुसळे, राजूरकर आदींनी दिला आहे.
मागणीकडे दुर्लक्ष
यापूर्वी पोचमार्गाची व मुख्य रस्त्याची डागडुजी अनेकदा करण्यात आली. यामध्ये जवळील उपलब्ध मुरुम, तर कुठे लाल माती, गिट्टी खड्यांमध्ये भरुन कागदोपत्री खडीकरण व डागडुजी दाखविण्यात आली. याबाबत नागरिकांनी मागणी लावून धरली. परंतु, कंत्राटदार व अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा वर्दहस्त आहे.
कामाचा निकृष्ट दर्जा
अनेक गावामध्ये रस्ते बनविताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. काही कंत्राटदार जाणीवपूर्वक हे काम करीत असताना अधिकारीही डोळेझाक करताना कामावरून दिसत आहे.