ओव्हरबर्डन केव्हा हटणार ?
By Admin | Updated: February 19, 2015 00:44 IST2015-02-19T00:44:14+5:302015-02-19T00:44:14+5:30
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे.

ओव्हरबर्डन केव्हा हटणार ?
चंद्रपूर: मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे. चंद्रपूरलगत वेकोलिने भलेमोठे ओव्हरबर्डन केले आहे.
पूरपरिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रपुरात आले असताना त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेकोलिला ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र वेकोलिचे ओव्हरबर्डन अद्याप दिमाखाने उभेच आहे.
चंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र बदलत चालले आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागतो व पूरपरिस्थिती निर्माण होते. ४० टक्के चंद्रपूरकरांना याचा दरवर्षी फटका बसतो. २०१३ मध्ये चंद्रपुरात तीन वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चंद्रपूरचा दौरा करीत पुराची पाहणी केली होती. यावेळी काहींनी पुराला वेकोलिचे ओव्हरबर्डनही कारणीभूत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले होते. त्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेकोलिला सदर ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वेकोलिने या संदर्भात कुठलेही पाऊल उचलले नाही. जिल्ह्यात केवळ मुंगोली, बल्लारपूर व पद्मापूर येथेच ढिगारे हटविण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. (शहर प्रतिनिधी)