नवानगर गावात विजेचा प्रकाश पडणार कधी?
By Admin | Updated: January 19, 2016 00:38 IST2016-01-19T00:38:20+5:302016-01-19T00:38:20+5:30
जग २१ व्या शतकाकडे झेपावला आहे. या काळात वीज ही प्रत्येकांची आवश्यक गरज झाली आहे.

नवानगर गावात विजेचा प्रकाश पडणार कधी?
प्रशासनाचे दुर्लक्ष : पिण्याच्या पाण्याची समस्या, मुलांसाठी अंगणवाडी केंद्रही नाही
घनश्याम नवघडे नागभीड
जग २१ व्या शतकाकडे झेपावला आहे. या काळात वीज ही प्रत्येकांची आवश्यक गरज झाली आहे. असे असले तरी नागभीड तालुक्यात असे एक गाव आहे की, त्या गावाने वीज कधी पाहिलीच नाही. एवढेच नाही तर अन्य सुविधांपासूनही हे गाव वंचित आहे.
नागभीड तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत हे गाव असून नवानगर असे गावाचे नाव आहे. या गावात जवळपास ३५ घरे आणि १२५ ते १५० एवढी लोकसंख्या आहे. गिरगावपासून १ किमी अंतरावर हे गाव आहे. नागभीड तालुक्यात जी काही पुढारलेली आणि प्रगतशिल मोजकी गावे आहेत, त्या प्रमुख गावात गिरगावचा समावेश होतो. त्या गिरगावने या नवानगरला विकास प्रक्रियेपासून आतापर्यंत कसे काय दूर ठेवले, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार विजेप्रमाणेच गावात अन्य कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. गावात रस्ते नाहीत, नाल्या नाहीत. शाळा तर नाहीच नाही. पण अंगणवाडीचे केंद्रही नाही. गावात १ ते ६ वयोगटातील १० मुले असली तरी अंगणवाडीच्या सुविधा त्यांना कशा मिळतात, हा एक प्रश्नच आहे.
मधुकर मेश्राम, टिकाराम सहारे आणि राजू वाघाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गावात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. गावात एक बोअर आहे, पण तिचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळे शेतातील विहीरीचाच पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करावा लागत आहे.
नवनगरच्या लोकांना विद्युत देण्यासंदर्भात गिरगाव ग्रामपंचायतीने २०१३ मध्ये एक ठराव घेतला. पण या ठरावापलीकडे कोणतीच हालचाल झाली नाही. या गावात कोणाच्याही घरी विद्युत नसल्यामुळे घरात टीव्ही, पंखा असल्याचा प्रश्नच नाही. विद्युत मिळावी म्हणून आता या गावातील २२ लोकांनी वीज कंपनीकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे वीज कंपनी येथील नागरिकांना किती हेलपाटे मारायला लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी आहे.