भावी शिक्षकांची परवड कधी थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:13 IST2018-09-04T23:13:17+5:302018-09-04T23:13:47+5:30
अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.

भावी शिक्षकांची परवड कधी थांबणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.
पूर्वी झटपट नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघितल्या जात होते. डीटीएडची पदवी धारण करुन बाहेर पडल्याबरोबरच शिक्षकाची नोकरी मिळायची. मात्र त्यानंतर शासनाने अनेक खासगी महाविद्यालयाला परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी शिक्षक पदविका घेणारे लाखों विद्यार्थी बाहेर पडू लागले. त्यामुळे शिक्षक पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांची फौज तयार झाली.
त्यातही शासनाने शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असताना टीईटी परीक्षा सुरु केली. टीईटी परीक्षा उत्तीर्णच विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी पात्र ठारणार होता. मात्र अनेक डीटीएड व बीएड पदविधारकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झालीच नाही. त्यातही शासनाने टीईटीधारकांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. पदवीकाधारकांनी ती परीक्षाही उत्तीर्ण केली. मात्र अद्यापही शासनाकडून कोणतीही भरती प्रकिया होत नसल्यामुळे पदवीकाधारकांचे शिषक बनण्याचे स्वप्न भंग होत आहे.
पवित्र पोर्टल ठरतेय डोकेदुखी
शासनाने मागील काही महिन्यांपूर्वी २० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे पदवीकाधारकांच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. त्यासाठी पवित्र पोर्टवरल अर्ज करायचे होते. अनेकांनी पोर्टलद्वारे अर्ज केले. मात्र अर्ज केल्यानंतरही विद्यार्थ्यांची अर्जाची पत्र निघाली नाही. त्यानंतर अर्जाची पत्र काढण्यासाठी व अर्जात दुरुस्ती करण्यासाठी रोल नंबरनुसार कालावधी देण्यात आला. यामध्ये अनेकांनी दुरुस्ती केली. मात्र दुरुस्ती झाली नाही. तसेच अर्जाची पत्रही निघाली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची घोषणा केवळ घोषणाबाजीतर नाहीना असा प्रश्न पदविकाधारकांना पडत आहे.
खासगी शाळेत लाखोंची रुपयांची मागणी
शासनाच्या नव्या धोरणानुसार खासगी शाळेतील शिक्षकांची भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने खाजगी शाळेत शिक्षणसेवक तसेच साहाय्य शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य पदविधारक ही रकम भरण्यास असमर्थ आहे. परिणामी शैक्षणिक पात्राता असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे.