गटशिक्षणाधिकारी शाळेत येताच मद्यपी शिक्षकाने काढला पळ
By Admin | Updated: February 10, 2016 00:53 IST2016-02-10T00:53:29+5:302016-02-10T00:53:29+5:30
गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक शाळेला भेट दिल्यानंतर नेहमीच शाळेत मद्य प्राशन करून येणाऱ्या एका शिक्षकाची चांगलीच भंबेरी उडाली.

गटशिक्षणाधिकारी शाळेत येताच मद्यपी शिक्षकाने काढला पळ
कान्हळगावातील प्रकार : अनागोंदीने गावकरी त्रस्त
कोरपना: गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक शाळेला भेट दिल्यानंतर नेहमीच शाळेत मद्य प्राशन करून येणाऱ्या एका शिक्षकाची चांगलीच भंबेरी उडाली. त्याला शाळेतून पळ काढावा लागल्याची घटना मंगळवारी तालुक्यातील कन्हाळगाव येथे घडली.
कन्हाळगाव जिल्हा परिषद शाळेतील दिलीप मोंढे हा शिक्षक नेहमीच दारू पिऊन शाळेत येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, गावातील नागरिकांनी शिक्षण विभागाकडे याबाबत अनेकदा तक्रारी केल्या. मंगळवारी स्वत: गट शिक्षण अधिकारी दिलीप खनके यांनी शाळेला भेट दिली असता, दिलीप मोंढे हा शिक्षक दारू पिऊन असल्याचे आढळून आले. ेगावातील नागरिक या शिक्षकाचे कारनामे सांगण्यासाठी शाळेत आले असता दिलीप मोंढे याने शाळेतून पळ काढला. त्यानंतर खणके यांनी सदर शिक्षकावर कोणतीही कार्यवाही न करता पंचनामावर असभ्य वर्तवणूक असल्याचा शेरा मारून नागरिकांना शांत केले. या शिक्षकावर कार्यवाहीची मागणी विठ्ठल शेंडे डॉ. प्रकाश खनके, मधुकर धुर्वे आदींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
जेव्हापासून दिलीप मोंढे हे शिक्षक कन्हाळगाव शाळेत रुजू झालेत, तेव्हापासून मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. येथील मुलांना साधी अक्षर ओळखही नाही. शिक्षक नेहमीच दारू पिऊन असतो. शाळा वेळेवर भरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
- विठ्ठल शेंडे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
शिक्षक दिलीप मोंढे हे शाळेत असभ्य वर्तन करुन मुलांच्या शिक्षणाचे नुकसान करीत आहे. शाळेत मद्यप्राशन करून येत असल्याबाबात वरिष्ठांकडे अहवाल पाठवून त्यांच्यावर कारवाई करु.
- दिलीप खनके, गटशिक्षणाधिकारी
दिलीप मोंढे या शिक्षकाची आठ दिवसांत बदली करण्यात न आल्यास शाळेला कुलूप ठोकण्यात येईल. या गावाचा विकास होण्याऐवजी येथील जि.प. शाळेतील मुले गावातच फिरताना पाहावयास मिळत आहे. या शिक्षकामुळे येथील मुलाचे आणि जीवनावर परिणाम होत आहे. अनेकदा तक्रारी देऊनही वरिष्ठ अधिकारी त्याची पाठराखण करीत असल्याचा प्रकार घडत आहे. तेव्हा मोंढे नामक शिक्षकाची बदली आठ दिवसात न केल्यास शाळेला कुलूप ठोकून आंदोलन केले जाईल.
डॉ. प्रकाश खनके, तालुका अध्यक्ष शिवसेना