आमचे काय चुकले? हळदावासीयांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 00:38 IST2017-06-17T00:38:09+5:302017-06-17T00:38:09+5:30
मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाची ठिणगी अखेर टोकाला पोहोचून होत्याचे नव्हते झाले, असे हळदा गावात घडले आहे.

आमचे काय चुकले? हळदावासीयांचा सवाल
भीतीने अर्ध्या गावाचे पलायन : वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरूच
रवी रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाची ठिणगी अखेर टोकाला पोहोचून होत्याचे नव्हते झाले, असे हळदा गावात घडले आहे. वाघाच्या बंदोबस्ताची मागणी एवढे उग्ररुप धारण करेल याची कुणालाही कल्पना नव्हती. कोणीतरी उचकवून हे कृत्य करण्यास भाग पाडले, हा फक्त त्यांचा गुन्हा. या गुन्ह्यातील खरे करते-सरते मात्र बाजूला राहिले व शिक्षा, भीती मात्र सामान्यांना सोसावी लागत आहे. तेव्हा आमचे काय चुकले? असा सवाल सध्या हळदावासीयांना पडला आहे.
घटनेचे गांभीर्य वनविभागाच्या लक्षात आणून देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे आणि शेतावर जाण्यासाठी वाघाची भीती कायम आहे. अशावेळेस आम्ही काय करावे, असा प्रश्नही सध्या गावकऱ्यांसमोर उभा आहे. दररोज या परिसरात कुठे कुठे गाय, शेळी, बैल अथवा मनुष्यावर वाघाने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. तेव्हा या गंभीर बाबीकडे वनविभागाने दुर्लक्ष का केले? किमान यावर तोडगा काढून गावकऱ्यांना फक्त दिलासा देण्याचा प्रयत्न तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का करण्यात आला नाही, असा सवालही याप्रसंगी निर्माण होत आहे.
वाघाच्या दहशतीने केवळ हळदा परिसरच नव्हे, तर तालुक्यातील ग्रामीण भागही भयभीत झाला आहे. तेव्हा ग्रामीण भागातील लोकांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. पण वनविभाग याचे उत्तर शोधण्याच्या भूमिकेत नापास झाला आहे. बुधवारी घडलेली हल्ल्याची घटना आणि रस्ता रोको आंदोलनाने गावात गावकरी दिसेनासे झाले आहे. अर्धा गाव पोलीस ठाण्यामध्ये तर अर्ध्या गावाने भीतीने गावाबाहेर पलायन केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांची गाडी फोडणे, वनविभागाच्या गाडीला पेटविण्याचा प्रयत्न करणे, हे केवळ पाच टक्के लोकांचेच कामे होते. पण या गुन्ह्यात ९५ टक्के ग्रामस्थ भरडले जात आहेत. त्यामुळे महिला, बालके, वयोवृद्ध नागरिक यांना आमचे काय चुकले या प्रश्नाने सध्या अस्वस्थ केले आहेत.
वाघ एक आहे. पण अनेक लोकांना निरुत्तर केले असल्याने खरीप हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाघाचे अस्तित्व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी किंबहूना मानवाच्या अस्तित्वालाही धोका होऊ नये, याची खबरदारी वनविभागाने खरच घेतली होती काय? हा प्रश्न स्वत: निरखून पाहण्याची वेळ या घटनेने वनविभागासमोर आहे. बहुतांश गावातील लोक हातावर आणून पानावर खाणारे आहेत. त्यांचा तरी विचार या कृतीने सुटणार काय? हाही प्रश्न समोर आवासून उभा आहे. वनविभागाचे अधिकारी नागरिकांचा सामना करीत आहेत. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र मूग गिळून चुप्पी साधली असल्याने अशा प्रकाराच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वेळीच उपाययोजना करणे आता गरजेचे आहे.