दारूबंदी विषयात देशकर गप्प का?-वडेट्टीवार
By Admin | Updated: August 30, 2015 00:43 IST2015-08-30T00:43:18+5:302015-08-30T00:43:18+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी आहे. मात्र दररोज लाखो, करोडो रुपयांची अवैध दारू पकडली जात असून याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दारूबंदी विषयात देशकर गप्प का?-वडेट्टीवार
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी आहे. मात्र दररोज लाखो, करोडो रुपयांची अवैध दारू पकडली जात असून याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. काहींना अटकही करण्यात येत आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून सदर बाब उघड होत असताना दारूबंदी विषयावर प्रा.अतुल देशकर गप्प का आहेत, असा सवाल प्रत्युत्तरादाखल आ.विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ज्यावेळी दारू सुरू होती, त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्यातील दारू जिल्ह्यात येत होती. तो त्यांचा व्यवसाय आहे. परंतु दारूबंदीनंतर त्यांचा संबंध या विषयात येतोच कुठे, असा प्रश्नही आ.वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. दारूबंदीचा निर्णय भाजपाने घेतला. तो जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर अंमलात आणला असता तर त्यांच्या सरकारला शाबासकी मिळाली असती, अशी कोपरखळीही वडेट्टीवार यांनी हाणली.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर एक थेंबही दारू विकली जात नाही. सात महिन्यात एकदाही दारू पकडली नाही. एकाही माणसावर गुन्हा दाखल झाला नाही, असे देशकर यांनी छातीठोकपणे सांगावे व माझ्याविरोधात अवमान याचिका दाखल करावी, असे आव्हानही त्यांनी देशकर यांना दिले आहे. (प्रतिनिधी)