पंचायत समितींमधील स्वच्छतेबाबत उदासीनता का?

By Admin | Updated: November 12, 2014 22:41 IST2014-11-12T22:41:36+5:302014-11-12T22:41:36+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. चांगला उपक्रम असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. मात्र गावखेड्यापासून शहरांपर्यंत स्वच्छतेबाबत उदासीनताच दिसून येत आहे.

What is the neutrality of cleanliness in Panchayat Samiti? | पंचायत समितींमधील स्वच्छतेबाबत उदासीनता का?

पंचायत समितींमधील स्वच्छतेबाबत उदासीनता का?

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. चांगला उपक्रम असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. मात्र गावखेड्यापासून शहरांपर्यंत स्वच्छतेबाबत उदासीनताच दिसून येत आहे.
गोंडपिपरी- स्वच्छतेबाबत येथील पंचायत समिती परिसर व कार्यालय परिसराला बुधवारी भेट दिली असता परिसरातील गवत काढून पार्किंग सोय, ठिकठिकाणी कचरा कुंड्या, प्रवेशद्वारास सजावटी तोरण तसेच अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील कर्मचारी स्वच्छता करण्यात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. मात्र सदर स्वच्छतेबाबत अधिक बारकाईने लक्ष घातले असता पं.स. कार्यालयाचे पुरुष मुत्रीघर रंगरंगोटीने जरी सजले असले, तरी मात्र सदर मुत्रीघराच्या मागील बाजुची मलमुत्र वाहून नेणारी पाईप लाईन फुटून असल्याचे निदर्शनास आले. तसेच पं.स. भवनातील अनेक कागदपत्रे धूळखात, पं.स. शिक्षण विभागाचे गटसाधन प्रशिक्षण केंद्रासमोर गवत वाढून परिसरात कचऱ्याची ढिगारे, पं.स. कार्यालयातील पेयजलचे रेफ्रीजरेटर असलेल्या ठिकाणी घाण तसेच अधिकाऱ्यांच्या चेंबरमधील प्रसाधन गृहाची पाईपलाईन फुटून असल्याचे आढळले.
येत्या दोन दिवसात सुरू होणाऱ्या स्वच्छता सप्ताहाची सर्व विभागाने दखल घेतली; मात्र केवळ देखावा निर्माण करून वरिष्ठांची शाबासकी मिळविण्याहेतू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले.
ब्रह्मपुरी : पंचायत समितीच्या आवारात ‘यशवंत बगीचा’ स्वच्छतेची साक्ष देत आहे. निर्मल भारत योजनेंतर्गत पंचायत समितीने मागील तीन वर्षापासूनच तालुक्यात स्वच्छता अभियान राबवून मानाचे स्थान प्राप्त केले आहे.
ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या प्रांगणात प्रवेश होताच निरनिराळे फुलझाडे, मेहंदी, लॉन व छोटे छोटे कटींग करून झाडे निसर्गरम्य स्वरूपात निर्माण झाले आहे. या परिसरातील बगीचाला ‘यशवंत’ नाव देण्यात आले आहे. पंचायत समितीच्या परिसरात बगीचा, साफसफाई, शौचालय व कार्यालयाची स्वच्छता बघता या पंचायत समितीला राज्यात तिसरे तर विभागात दुसरे क्रमांक देऊन गौरविण्यात आले आहे. पंचायत समितीच्या आवारातील भिंतीवर अनेक स्वच्छतेविषयक चित्रे गेल्या तीन वर्षापूर्वीच काढून स्वच्छतेचा कानमंत्र देताना कम्पाऊंडवरील काढलेल्या चित्रावरुन दिसून येत आहे. आजघडीला ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या व्यतिरिक्त कोणत्याही कार्यालयात एवढी स्वच्छता दिसून येत नाही. त्या ठिकाणी स्वच्छतेबाबत उदासीनताच दिसून येते. पंचायत समितीच्या संदर्भात येथे ‘ड्रेस कोड’ कर्मचाऱ्यांना दिले आहे. ही बाब अन्य भागात कुठेही दिसून येत नाही. तत्कालिन संवर्ग विकास अधिकारी नारायण सानप यांनी ‘यशवंत बगीचा’ व कर्मचाऱ्यांना शिस्त, ड्रेस कोड आदी उपक्रम राबवून पंचायत समिती फुलविण्याचे काम केले आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी विद्यमान संवर्ग विकास अधिकारी गिडेवार हे प्रयत्न करीत आहेत. एकूणच ब्रह्मपुरीची पंचायत समिती ‘निर्मल ग्राम’ योजनेच्या अटीत खरी उतरते.
भद्रावती : स्वच्छता ठेवण्याचे आदेश देणाऱ्या भद्रावती पंचायत समितीच्या वसाहतीमध्येच व सभापतींच्या निवासस्थान परिसरात अस्वच्छतेचा कळस आहे. पंचायत समितीची वसाहत जवळपास १० वर्षापासून पडीत आहे. या ठिकाणी कोणताही कर्मचारी वास्तव्यास नाही. त्यामुळे याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात कचरा निर्माण झाला आहे. सध्या येथे बेवारस प्राण्यांनी आपला कब्जा केला आहे. सभापती निवासस्थान परिसरात घाण दिसून येते. (लोकमत चमू)

Web Title: What is the neutrality of cleanliness in Panchayat Samiti?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.