ताडोबातील २९ वाघांचे काय झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 04:46 IST2017-05-14T04:46:15+5:302017-05-14T04:46:15+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ९१ वाघ आढळले असताना यंदा ६२ वाघांचे दर्शन झाल्याची माहिती वनविभागाने दिल्याने व्याघ्र गणनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

ताडोबातील २९ वाघांचे काय झाले?
मिलिंद कीर्ती।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गतवर्षी वन्यजीव गणनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ९१ वाघ आढळले असताना यंदा ६२ वाघांचे दर्शन झाल्याची माहिती वनविभागाने दिल्याने व्याघ्र गणनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसरीकडे ही गणना योग्य असेल तर २९ वाघ गेले कोठे, असा सवाल विचारला जात आहे.
राज्यातील वन्यप्राण्यांची बुधवारी गणना करण्यात आली. ताडोबातील वन्यप्राण्यांची गणना करण्यासाठी कोर झोनमध्ये ८२ व बफर झोनमध्ये १०९ मचाणी उभारण्यात आल्या होत्या. पाणवठ्यावरील प्राण्यांच्या नोंदीनुसार ६२ वाघ व १९ बिबट आढळून आले. गेल्या वर्षीच्या गणनेत ताडोबामध्ये ९१ पेक्षा अधिक वाघ आढळून आल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक जी. पी. गरड यांनी दिली. यंदा २९ वाघांची घट दिसून येत आहे. ही घट खरी असेल तर अन्य वाघांचे काय झाले, अशी शंका व्यक्त होत आहे.
ताडोबामध्ये बुधवारच्या वन्यजीव गणनेत सहभागी होण्यासाठी वन्यप्रेमी आणि व्याघ्र क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी सर्वाधिक ७०० अर्ज केले. प्रत्यक्षात केवळ १५० युवकांना सहभागी करण्यात आले. तर बफर झोनसाठी ४०० व्यक्तींसाठी २०० अर्ज आले. त्यापैकी पुणे, मुंबई, नागपूरमधील बहुसंख्य लोकांना वन्यजीव गणनेची कोणतीही तांत्रिक माहिती नव्हती. अप्रशिक्षित लोकांनी वाघांची नोंद व्यवस्थित न केली असण्याची शक्यता अधिक आहे.
वन्यजीव गणनेत प्रगणकांना ६२ वाघांचे दर्शन झाले आहे. ताडोबाच्या कोर व बफर झोनमध्ये गेल्या वर्षीपेक्षा मचाणी कमी होत्या. त्यामुळे वाघाची नोंद कमी झाली आहे. ताडोबामध्ये वाघांची संख्या कायम आहे. ते कमी झाले, असे म्हणता येत नाही.
- जी. पी. गरड, मुख्य वनसंरक्षक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.