राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला काय मिळाले

By Admin | Updated: March 19, 2017 00:35 IST2017-03-19T00:35:34+5:302017-03-19T00:35:34+5:30

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक जाणीव जपत चंद्रपूरच्या दीक्षा भूमीसाठी भरीव तरतूद केली आहे.

What did the district get in the state's budget? | राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला काय मिळाले

राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला काय मिळाले

चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक जाणीव जपत चंद्रपूरच्या दीक्षा भूमीसाठी भरीव तरतूद केली आहे. याशिवाय चंद्रपुरात सैनिकी स्कूल, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, वन अकादमी संकुल, शहराला सीसीटीव्हीचे संरक्षण आणि विमानतळाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
चंद्र्रपूरचे पालकमंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पात जिल्हयाला आणखी काय मिळणार याबाबत नागरिकांना उत्सुकता होती. जनतेने आज टिव्हीवर हा अर्थसंकल्प बघितला. या अर्थसंकल्पात देखील जिल्हयात सुरू असलेल्या विकास कामांना अधिक गतीशील करणारे काही निर्णय झाले.
चंद्रपूरकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यात विकासाभिमुख सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा सलग तिसरा अर्थसंकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. शेतकरी ते वारकरी यांच्या संदर्भात अत्यंत कणव ठेवून त्यांनी अर्थसंकल्पात तरतूदी केल्याच्या प्रतिक्रीया आज शहरात उमटल्या. विदभार्तील शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने कृषी पंपातील अनुशेष दुर करण्यासाठी चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा व गडचिरोली जिल्हयासह राज्यासाठी ९७९ कोटी १० लाख एवढ्या निधीची तरतूद केली आहे. प्रत्येक योजनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला सहभागी करतानाच काही विशेष निर्णयही जिल्ह्यासाठी घेतले गेले आहेत.
त्यांपैकी चंद्रपूर येथील सैनिक शाळेचा एक निर्णय आहे. सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर येथे दोनशे कोटी रुपए शाळा उभारण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. वडसा- देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मागार्साठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सोबत हवाई वाहतूकीमध्ये चंद्रपूर विमानतळाच्या पायाभूत सुविधा बळकटी करणाला प्राधान्य देत कोटयावधीची तरतूद केली आहे. यामध्ये पुनर्वसनाच्या संदर्भातही भरीव तरतूद आहे.वनमंत्री म्हणून वृक्षलागवडीला लिमका बुक आॅफ रेकार्डमध्ये घेऊन जाणारे मुनगंटीवार अर्थसंल्पातही या मुदयावर ठाम राहीले.
वृक्ष लागवडीचा त्यांनी संकल्प यावेळी ही ठेवला आहे. सोबतच वनाशेजारील गावकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर गॅस सिलेंडर वाटप करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात केला आहे. याचा मोठया प्रमाणात फायदा चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे. जंगलात लागणाऱ्या वणव्याला नियंत्रित करण्यासाठी चंद्रपूर वन अकादमी संकुल परिसरात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात धडक कृती दल केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
यासाठी पाच कोटीची तरतूद करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा चंद्रपूर शहराशी असणारा भावनिक जिव्हाळा लक्षात घेता, चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर भवन उभारण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात त्यांनी जाहीर केला. हे स्मारक भव्य बांधले जाणार असून त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे चंद्रपुरकरातील बौद्ध बांधवाना आनंद झाला आहे.
चंद्रपूर शहराची सुरक्षितेलाही या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. शहर सुरक्षित राहावे यासाठी संपूर्ण महानगरात सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
गुन्हे सिध्दीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढवून राज्य सरकारने गुन्हेगारीवर अंकुश लावाला आहे. विदर्भात आता चंद्रपूरात न्यायवैज्ञानिक लघु प्रयोग शाळा सुरु करण्याची घोषणा, त्याचबरोबर बेरोजगारांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. अशा घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.(नगर प्रतिनिधी)

Web Title: What did the district get in the state's budget?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.