वृक्षदिंडीचे चंद्रपुरात जल्लोषात स्वागत
By Admin | Updated: June 26, 2016 00:42 IST2016-06-26T00:42:33+5:302016-06-26T00:42:33+5:30
ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

वृक्षदिंडीचे चंद्रपुरात जल्लोषात स्वागत
अनिल सोले : वृक्ष लागवडीनेच मानवी जीवन समृध्द होईल
चंद्रपूर : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचे गुरुवारी सायंकाळी ८ वाजता चंद्रपुरात आगमन झाले. या दिंडीचे चंद्रपूरकरांनी जल्लोषात स्वागत केले.
दरम्यान, याचे औचित्य साधून शुक्रवारी महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक गांधी चौकात आयोजित वृक्ष लागवड व संवर्धन या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ते म्हणाले, राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने एका दिवसात राज्यामध्ये दोन कोटी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला गेला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे ब्रीद घेऊन पुढे जाऊ, तरच भूतलावरील मनुष्यांचे जीवन समृद्ध होईल. यावेळी आमदार नाना शामकुळे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, झोन सभापती देवानंद वाढई, विजय राऊत, गटनेता अनिल फुलझेले, तुषार सोम, राहुल पावडे, एस्तेर शिरवार, आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपायुक्त डॉ. विनोद इंगले आदींची उपस्थिती होती.आमदार सोले म्हणाले, वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, पाणी, वृक्ष ही आपली दौलत आहे. सध्या विविध कारणामुळे ५० टक्के वनसंपदेचा ऱ्हास झाला. त्यामुळे विनामुल्य आॅक्सिजनपासून आपण मुकलो आहोत, यावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाचे व्रत घ्यावे. (शहर प्रतिनिधी)