फोलिक अॅसिड गोळ्या देऊन नवविवाहित महिलेचे केले जाते स्वागत !
By Admin | Updated: June 22, 2015 01:11 IST2015-06-22T01:11:32+5:302015-06-22T01:11:32+5:30
शासन प्रत्येक नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा देण्यास कटिबद्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगवेगळे ....

फोलिक अॅसिड गोळ्या देऊन नवविवाहित महिलेचे केले जाते स्वागत !
पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्र : नावीन्यपूर्ण उपक्रम ठरत आहे इतरांसाठी प्रेरणादायी
पोंभुर्णा : शासन प्रत्येक नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा देण्यास कटिबद्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगवेगळे कार्यक्रम राबवून प्रत्येक नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, याकरिता नेहमी प्रयत्नशील असते. अशाच प्रयत्नाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास धनगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रत्येक गावातील नवविवाहित महिलेला फोलिक अॅसिडच्या ३० गोळ्या वाटप करून त्यांचे स्वागत करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
डॉ. धनगे यांनी सांगितले की, मुलींच्या रक्ताचे प्रमाण हे कोणत्या ना कोणत्या कारणाने कमी होत असते. त्यामुळे ताप येणे, जेवण कमी करणे, द्विधा मानसिकतेत राहणे, विचारमग्न राहणे या सर्व बाबींवर फोलिक अॅसिड अत्यंत गुणकारी आहे. फोलिक अॅसिडची गोळी रोज एक वेळा जेवण केल्यानंतर नियमित घेतल्यास शरीरातील रक्ताचा पुरवठा वाढत असतो. त्यामुळे नवविवाहित महिला उत्साहित राहू शकतात, असे सिध्द झाले आहे. यामुळे आपण हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करून प्रत्येक गावातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सोयी सुविधा लोकांपर्यंत पोहोचविणे व वेळोवेळी वेगवेगळे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजित करून लोकांना आरोग्याबाबत जागृत करण्याचा प्रयत्न या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केला जात असल्याचे धनगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सिकलसेल तालुका पर्यवेक्षक प्रमोद राऊत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजय ब्राह्मणे, फॉर्मासिस्ट नीलेश साऊरकर, आरोग्य सहायक बोढे, चौधरी उपस्थित होते. दरम्यान, सिकलसेलग्रस्त महिलांची गर्भजल तपासणी मोफत करण्याची मागणी परिसरातील महिलांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)