एका डॉक्टरवर सहा उपकेंद्रांचा भार
By Admin | Updated: October 29, 2014 22:46 IST2014-10-29T22:46:58+5:302014-10-29T22:46:58+5:30
येथील प्राथमिक केंद्रात चार महिन्यापासून महिला डॉक्टराचे पद रिक्त आहे. महिला डॉक्टराची नियुक्ती न केल्याने उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णाची मोठी कुचंबणा होत आहे.

एका डॉक्टरवर सहा उपकेंद्रांचा भार
घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्र : महिला डॉक्टराचे पद रिक्त
घुग्घुस : येथील प्राथमिक केंद्रात चार महिन्यापासून महिला डॉक्टराचे पद रिक्त आहे. महिला डॉक्टराची नियुक्ती न केल्याने उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णाची मोठी कुचंबणा होत आहे. एका डॉक्टरावर सहा उपकेंद्राचा कारभार चालत असून दररोज अडीचशे पेक्षा अधिक बाह्य रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार, पोलिसांकडून येणाऱ्या एमएलसी आदीचा भार सोसावा लागत आहे.
येथील प्राथमिक केंद्रात महिन्यात सरासरी २८ प्रसुतीच्या केसेस होत असतात. त्यामुळे या केंद्रात त्वरित महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करुन महिलांची होत असलेली कुचंबना थांबविण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य ममता खैरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. येथील प्राथमिक केंद्रात दररोज अडीचशेपेक्षा अधिक बाह्य रुग्णांची तपासणी, महिन्यात सरासरी २८ प्रसुतीच्या केसेस होत असतात. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या संदर्भात एमएलसी असे कार्य आणि शासकीय योजनाचे काम केवळ एकच डॉक्टरला करावी लागत आहे. दररोज येणाऱ्या बाह्य रुग्णामध्ये अधिकतर संख्या महिलांची असते. मात्र महिला डॉक्टर नसल्याने महिला रुग्णांची कुचंबना होत आहे. अनेकदा महिला डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी विविध स्तरावरुन झाली असली तरी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून दखल घेतली गेलेली नाही. प्राथमिक केंद्रातील रिक्त महिला डॉक्टराचे पद लवकर भरुन महिला रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्या ममता खैरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)