आठ कर्मचाऱ्यांवर ७२ गावांचा भार

By Admin | Updated: August 2, 2015 01:18 IST2015-08-02T01:18:28+5:302015-08-02T01:18:28+5:30

येथील विद्युत वितरण उपकेंद्रामध्ये ७२ गावे आहेत. मात्र याठिकाणी केवळ आठ कर्मचारी कार्यरत असल्याने एका कर्मचाऱ्यावर आठ ते नऊ गावातील कामांचा भार पडत आहे.

The weight of 72 villages on eight employees | आठ कर्मचाऱ्यांवर ७२ गावांचा भार

आठ कर्मचाऱ्यांवर ७२ गावांचा भार

पोंभूर्णा : येथील विद्युत वितरण उपकेंद्रामध्ये ७२ गावे आहेत. मात्र याठिकाणी केवळ आठ कर्मचारी कार्यरत असल्याने एका कर्मचाऱ्यावर आठ ते नऊ गावातील कामांचा भार पडत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात वीज पुरवठा देण्यात विद्युत विभागाकडून अडचण निर्माण होत आहे. महावितरणाच्या या आंधळ्या कारभारामुळे स्थानिक नागरिकांना अनेकदा अंधारात राहावे लागत आहे.
तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभूर्णा येथे ३३ के.व्ही. संचाचे महावितरणाचे उपकेंद्र कार्यालय आहे. याठिकाणी दोन अधिकारी व आठ तंत्रज्ञ कर्मचारी आहेत. तालुक्यामध्ये ७२ गावे असताना कर्मचाऱ्यांची संख्या केवळ आठ आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांवर आठ ते नऊ गावांतील वीज विषयक कामाचा भार पडत आहेत. त्यातच या गावांतील परिसराचा विस्तार मोठा असल्याने एका कर्मचाऱ्याला काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना वीज पुरवठ्याची सुविधा मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरवर्षी घरगुती वीज पुरवठा घेणाऱ्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. या तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी विहिरीचे काम केले. त्या ठिकाणी कृषी पंपाच्या वीज जोडणीमध्येसुद्धा सातत्याने वाढ होत आहे. एकंदरीत परिसरामध्ये वीज जोडणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या मुष्यबळात वाढ केली जात नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वाढत्या लोकसंख्येचा व त्यामानाने वाढणाऱ्या विद्युत जोडणीचा विचार करता वीज वितरण कंपनीने मनुष्यबळात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. असे झाल्यास परिसरातील नागरिकांना विद्युत सेवा सुरळीत देता येणार आहे. याठिकाणी हलक्या स्वरुपाचे वादळ वा पाऊस झाला तरी विद्युत पुरवठा खंडीत होत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. (तालुका प्रतिनिधी)
३३ के.व्ही.ची दुरुस्ती वाहिनी तत्काळ सुरू करावी
नवीन विद्युत केंद्राची निर्मिती व्हावी
पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे याठिकाणी नवीन विद्युत केंद्राची निर्मिती करण्यात यावी, अशी परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. विद्युत केंद्राची निर्मिती झाल्यास त्याठिकाणी असलेला कर्मचारी वर्ग त्या परिसरातील २० ते ३० गावांचा कार्यभार सांभाळू शकणार आहे. त्यामुळे पोंभूर्णा येथील कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त भार कमी होवून ते तेथील नागरिकांना विद्युत पुरवठ्याची योग्य सुविधा देऊ शकणार आहेत.
मिनी मेटॅडोरची व्यवस्था करावी
पोंभूर्णा येथील विद्युत वितरण उपकेंद्रात वाहनाची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांना एखाद्या ठिकाणी रोहित्र नेणे किंवा बदलविणे यासाठी गोंडपिंपरी किंवा बल्लारपूर येथून वाहन बोलवावे लागते. त्यामुळे ते वाहन येईपर्यंत कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने अडचण निर्माण होते. त्यामुळे याठिकाणी मिनी मेटॅडोरची व्यवस्था केल्यास कामात अडचण निर्माण होणार नाही व नागरिकांना चांगली सुविधा देता येईल.

Web Title: The weight of 72 villages on eight employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.