आठवडाभरात जिवती येथे डॉक्टर रुजू करा
By Admin | Updated: August 20, 2016 00:44 IST2016-08-20T00:44:29+5:302016-08-20T00:44:29+5:30
तालुक्यामध्ये साथीच्या रोगांमुळे अनेकांचा जीव जात असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

आठवडाभरात जिवती येथे डॉक्टर रुजू करा
पालकमंत्र्याचे आदेश : शिष्टमंडळाने मांडली समस्या
जिवती : तालुक्यामध्ये साथीच्या रोगांमुळे अनेकांचा जीव जात असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केला. पंचायत समिती सदस्य महेश देवकते यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंंडळाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. तेव्हा आठवडाभरात वैद्यकीय अधिकारी जिवती येथील ग्रामीण रुग्णालयात नियुक्त करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात बालकाच्या मृत्यूनंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रकाश टाकला. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या जागा रिक्त असून यामुळे तालुक्यातील नागरिक हैराण आहेत. वैद्यकीय डॉक्टरांच्या जागा भरणासंदर्भात अनेक दिवसांपासून रेटा सुरू होता. पण १३ आॅगस्टला खुद जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: ही बाजू मनावर घेतली असून आठवडाभरात जिवती येथील दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी रुजू करुन घ्या, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाच नाही तर नागपूर येथील आरोग्य उपसंचालकांना दिले आहेत.
जिवती हे तालुक्याचे ठिकाण असून येथे प्राथमिक अरोग्य केंद्र आहे. परिसरात एकच दवाखाना असल्याने या ठिकाणी रुग्णाची गर्दी असते. परंतु येथे स्थायी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रुग्णांची गैरहोय होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन जागा रिक्त असून येथे प्रभारी डॉक्टरवर दवाखान्याची धुरा आहे. तालुक्यातील पंचायत समिती सदस्य महेश देवकते यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत १३ आॅगस्ट रोजी शिष्टमंडळासह चंद्रपूर येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्याची दखल घेत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य उपसरपंचालक यांना फोन करून दवाखान्यासाठी आठवडाभरात नागपूरवरुन डॉक्टर पाठवा असे आदेश दिले. त्यामुळे डॉक्टर रुजू होणार, अशी आशा आहे. (शहर प्रतिनिधी)
साथीच्या आजाराचा उद्रेक
सध्या तालुक्यात विविध आजार पसरले असून अनेक रुग्ण डॉक्टरअभावी गडचांदूर-चंद्रपूर येथे उपचारासाठी जात आहेत. जिवती येथील सरकारी दवाखान्यात डॉक्टर नसून प्रभारी महिला डॉक्टरला रुग्णांची गर्दी सांभाळावी लागत आहे. मलेरिया, टाईफाईड, हगवण यासारखे आजार वाढले आहेत. परिणामी येथे वैद्यकीय अधिकाऱ्याची आवश्यकता आहे.