हवामान केंद्राचे स्थानांतरण अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:48 IST2017-05-15T00:48:47+5:302017-05-15T00:48:47+5:30
उन्हाळा मे महिन्याच्या मध्यावर आला आहे. त्यात चंद्रपूर शहराचे तापमान कधी कमी तर कधी अधिक नोंदविले जात आहे.

हवामान केंद्राचे स्थानांतरण अधांतरी
मनपावर जबाबदारी ढकलली : २०१३ पासून प्रशासनाकडे पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उन्हाळा मे महिन्याच्या मध्यावर आला आहे. त्यात चंद्रपूर शहराचे तापमान कधी कमी तर कधी अधिक नोंदविले जात आहे. त्यावर पर्यावरणतज्ज्ञांनी आक्षेप नोंदविला आहे. प्रत्यक्षात चंद्रपूरच्या तुकूम परिसरात असलेल्या हवामान मापन केंद्राच्या स्थानांतरणाचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून रखडलेला आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या २ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोपवून हवामान मापन केंद्र स्थानांतर करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर सोपवून कळस केला आहे.
चंद्रपूर शहराचे तापमान अधिक असल्याची नोंद ब्रिटिश राजवटीपासून घेण्यात येत आहे. विदर्भात चंद्रपूरचे तापमान अधिक असते, हेदेखील ब्रिटिश काळात नोंदविण्यात आले आहे. त्याकरिता ब्रिटिशांनी तुकूम परिसरात हवामान मापन केंद्राची स्थापन केली आहे. ते केंद्र आता भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत भारत मौसम विज्ञान विभागाकडे सोपविण्यात आले आहे. त्या केंद्रातील तापमान व पावसाच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतल्या जातात. या केंद्राची स्थापना करताना तुकूम परिसरात लोकवस्ती नव्हती. आता तेथे अतिक्रमणासह उंच इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे.
स्वयंचलित हवामान मापक केंद्राची गरज
स्वयंचलित हवामान मापन केंद्र स्थापन करण्याची मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. त्यांनी २०१३ पासून मागणी रेटून धरली आहे. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्याला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तरीही हा प्रश्न कायम आहे.
उदासीनतेमुळे प्रश्न प्रलंबित
चंद्रूपर जिल्हा पर्यावरण संतुलन समितीची बैठक १२ डिसेंबर २०१३ रोजी झाली होती. ही बैठक प्रत्येक तीन महिन्यांनी व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात १२ डिसेंबरच्या बैठकीचे इतिवृत्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी. एम. जोशी यांनी ९ मार्च रोजी उपलब्ध केले. त्यातही हवामान मापक केंद्र स्थानांतरणाची जबाबदारी संबंध नसलेल्या महानगरपालिकेवर सोपविण्यात आली. मनपाकडे नवीन ब्याध जोशींनी लावली आहे.