वेकोलित कामगारांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर!
By Admin | Updated: March 20, 2015 01:08 IST2015-03-20T01:08:14+5:302015-03-20T01:08:14+5:30
वेस्टर्न कोल फिल्ड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलि गोवरी उपक्षेत्रात सुरक्षेअभावी कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.

वेकोलित कामगारांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर!
गोवरी : वेस्टर्न कोल फिल्ड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलि गोवरी उपक्षेत्रात सुरक्षेअभावी कामगारांचा जीव धोक्यात आला आहे. वेकोलि प्रशासन सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून कामगारांकडून काम करवून घेत असल्याने वेकोलित कामगारांच्या अपघातात वाढ झाली आहे.
बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीत कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही सुविधा पुरविण्यात येत नाही. याकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. मागील आठवड्यात डोजर सेक्शनमध्ये डोजर दुरुस्तीचे काम करताना शंकर आगलावे या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वेकोलितील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेकोलि कामगारांना सुरक्षेच्या कोणत्याही सोयीसुविधा पुरवित नाही. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. वेकोलित अनेक मशीन जुन्या आहेत. त्या मशीनची काम करण्याची क्षमता नसताना अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार काम करावे लागत आहे. अनेक जुन्या मशीनच्या कॅबीन खराब झाल्या आहेत. माती, कोळसा टाकणारे डम्पर अखेरच्या घटका मोजत आहे. वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमावणाऱ्या वेकोलित कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिवसेंदिवस कामगारांच्या अपघातात वाढ झाली असून वेकोलित कामगारांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे. (वार्ताहर)