नैसर्गिक संपदेच्या वापरात आपण चुकलो

By Admin | Updated: April 10, 2016 00:46 IST2016-04-10T00:46:41+5:302016-04-10T00:46:41+5:30

जिल्ह्यात वन, खनिज व जलसंपदा मुबलक प्रमाणात आहे. मात्र आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करु शकलो नाही.

We have lost the use of natural resources | नैसर्गिक संपदेच्या वापरात आपण चुकलो

नैसर्गिक संपदेच्या वापरात आपण चुकलो

सुधीर मुनगंटीवार : इरई पुनरूज्जीवनाच्या कामाला प्रारंभ
चंद्र्रपूर : जिल्ह्यात वन, खनिज व जलसंपदा मुबलक प्रमाणात आहे. मात्र आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करु शकलो नाही. पाणी जमिनीत मुरविण्यात आपण कमी पडलो. त्यामुळेच नद्यांची अवस्था बिकट झाली आहे. नद्या वाचविणे आता गरजेचे झाले आहे. त्यांच्या वापरात आपण चुकलो, असे प्रतिपादन वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांच्या वतीने आयोजित इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम शुभारंभ व जलयुक्त शिवार अंतर्गत नवीन सयंत्राचे उद्घाटन शनिवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्र्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर होते. महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, उपमहापौर वसंता देशमुख, अधिक्षक अभियंता जे. एम. शेख, जि. प. सभापती देवराव भोंगळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने व महिंद्र्राचे मारुती माथुर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, नद्या वाचविणे गरजेचे झाले आहे. इरई नदीपासून हे काम हाती घेतले असून नदी पुनरूज्जीवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. जलयुक्त शिवार अंतर्गत घेण्यात आलेल्या सात जेसीबी मशीन्सचे उद्घाटन यावेळी पाहुण्यांंच्या हस्ते करण्यात आले. इरई नदीचे खोलीकरण व सौंदर्यीकरण यासाठी ८४ कोटी रुपयांचे नियोजन असले तरी या कामासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल, असे पालकमंत्री म्हणाले. जलसंधारण महामंडळ सरकारने पुनर्गठित केले असून त्यांचा निधी या कामासाठी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नदीपात्रातील गाळ तीन ते पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत मोफत देता येईल का यावर प्रशासनाने विचार करावा, असे ते म्हणाले.
सिंचनाची सोय व प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठीच जलयुक्त शिवार हा कार्यक्रम असल्याचे आमदार नाना शामकुळे यांनी सांगितले. केवळ १ हजार ४५० कोटी रुपयात अडीच लाख शेतकऱ्यांच्या सहा लाख हेक्टर जमिनीला याच फायदा झाला. इरई नदीला संरक्षण भिंत होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रस्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. इरईचे खोलीकरण व सौंदर्यीकरणासाठी ८४ कोटी रुपयांचे नियोजन आहे.
या मशीनच्या साहाय्याने ६३१ टीसीएम गाळ काढण्यात येणार असून हे काम ३१ मे पूर्वी होणे अपेक्षित आहे. यामुळे अडीच किलोमीटर नदी मोकळी होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी तर उपस्थितांचे आभार सचिन झेंडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)

दूरगामी उपक्रम - अहीर
जलयुक्त शिवार हा अतिशय नियोजनबद्ध व दूरगामी परिणाम करणारा कार्यक्रम असून केंद्र सरकारने या कामाची दखल घेतली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. इरई पुनरूज्जीवन, नाला खोलीकरण व बंधारे बांधकाम ही काळाची गरज आहे. भविष्यात शेती व पिण्यासाठी पाणी याच प्रयत्नातून उपलब्ध होणार आहे. इरई पुनरूज्जीवनाच्या कामात नागरिकांनीही आपला सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: We have lost the use of natural resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.