जिद्द, चिकाटी, परिश्रम हाच यशाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:35 IST2019-03-19T22:35:06+5:302019-03-19T22:35:24+5:30
कोणतेही यश सहज मिळत नाही. त्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम करावे लागते, तेव्हा यशप्राप्ती होते, असे प्रतिपादन कुमुदिनी पाथोडे हिनी केले.

जिद्द, चिकाटी, परिश्रम हाच यशाचा मार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : कोणतेही यश सहज मिळत नाही. त्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम करावे लागते, तेव्हा यशप्राप्ती होते, असे प्रतिपादन कुमुदिनी पाथोडे हिनी केले.
२०१८ ला लोकसेवा आयोगाने घेतलेल्या एमपीएससी परीक्षेत नागभीड तालुक्यातून चौघांनी बाजी मारली. त्यांची पीएसआय म्हणून निवड झाली. या चौघांचाही डोंगरगाव येथील शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमपीएससीचे प्रशिक्षक विरेंद्र पडवळ, नगरसेवक दिनेश गावंडे उपस्थित होते. प्रारंभी कुमुदिनी नानाजी पाथोडे, निखील अरविंद राहाटे व कुंभरे या गुणवंतांना फेटे बांधून ढोल ताशाच्या निनादात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर गावातील प्रमुख चौकात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास गावातील आबालवृद्धांनी गर्दी केली होती. यावेळी निखील राहाटे, रूपेश कुंभरे या गुणवंतानी आपले मनोगत व्यक्त केले. तर नगरसेवक दिनेश गावंडे, प्रशिक्षक विरेंद्र पडवळ व पालक अरविंद राहाटे यांनी मार्गदर्शन झाले. विदर्भातील विद्यार्थ्यांनी आता समोर यायला पाहीजे, आपण मार्गदर्शन करण्यास तयार आहोत, असा विश्वास प्रशिक्षक पडवळ यांनी व्यक्त केले. तर होतकरू विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यास मदत करण्याचे आश्वासन नगरसेवक गावंडे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पंकज पाथोडे, संचालन गुरूदेव शिवनकर तर उपस्थिताचे आभार गोविंदा नंदापुरे यांनी मानले.