सात प्रकल्प ड्राय होण्याच्या मार्गावर

By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:04+5:302016-04-03T03:50:04+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. तसा पाण्याचा प्रश्नही भिषण होत चालला आहे.

On the way to the seven projects being dry | सात प्रकल्प ड्राय होण्याच्या मार्गावर

सात प्रकल्प ड्राय होण्याच्या मार्गावर

महिलांची दूरवर भटकंती : ग्रामीण भागात पाणी टंचाईची झळ
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. तसा पाण्याचा प्रश्नही भिषण होत चालला आहे. ग्रामीण पट्टयातील अनेक गावात पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. गावातील जलस्रोत आटण्याच्या मार्गावर असून महिलांची आतापासून पाण्यासाठी भटकंती चालू झाली आहे. पाण्याची पातळी वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प व त्यातील साठा अखेरची घटका मोजत आहे. बारापैकी सहा सिंचन प्रकल्प ड्राय होण्याच्या मार्गावर असून उर्वरित प्रकल्पातही चिंताजनक जलसाठा शिल्लक आहे.
यंदा पावसाळ्यात वरूणराजाने जिल्ह्यावर वक्रदृष्टी दाखविली. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला. या अत्यल्प पावसाचा खरीप हंगामावर अत्यंत प्रतिकुल परिणाम झाला. जिल्ह्यातील बहुतांश शेती नैसर्गिक पावसावर अवलंबून असल्याने अनेक शेतकऱ्यांना शेती पिकविताना कसरत करावी लागली. तरीही कशीबशी शेती पिकविली. मात्र अत्यल्प पावसाचा होणारा परिणाम झालाच. शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. झाले त्या उत्पन्नात लागवड खर्चही निघाला नाही. डोक्यावरचे कर्जाचे ओझे डोक्यावरच कायम राहिले. पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने याचा परिणाम पुढे रब्बी हंगामावरही झाला. नदी-नाल्यात पाणी साठवू न शकल्याने अनेक शेतकऱ्यांनी रबीत पिकांची लागवड केली नाही. परिणामी रबीचा पेराही घटला. अगदी निम्म्यावर आला.
अत्यल्प पावसाची झळ केवळ शेतकऱ्यांनाच बसली नाही. याचे परिणाम दूरगामी झाले. त्या अत्यल्प पावसामुळे आता गावागावातील परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. कमी पावसामुळे जमिनीत पाणी मुरु शकले नाही. नदी-नाले, तलाव, बोड्या यामध्येही पाहिजे तेवढे पाणी पावसाळ्यात साठू शकले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी खालावत गेली. चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनासाठी तयार करण्यात आलेले ११ सिंचन प्रकल्प आहे. आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अंमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव, दिना व इरई या प्रकल्पातूून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळते. मात्र पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने या सिंचन प्रकल्पात पाण्याची मुबलक साठवणूक होऊ शकली नाही. यंदा हिवाळ्यातही थंडीने हुलकावणी दिली. बोटावर मोजण्याइतक्या दिवसच जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवला. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी खालावत गेली. डिसेंबर-जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाची स्थिती चिंताजनक होती. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आता परिस्थिती बिकट झाली आहे.
या ११ सिंचन प्रकल्पापैकी चंदई, लभानसराड आणि दिना सिंचन प्रकल्प ड्राय झाले आहे. या प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. याशिवाय नलेश्वर, घोडाझरी, चारगाव, अमलनाला हे प्रकल्पही ड्राय होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात १० टक्क्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, या सिंचन प्रकल्पामुळे त्या परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. मात्र सिंचन प्रकल्पातच पाणी नसल्याने पाण्याची पातळी धोकादायक स्थितीत पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावात पाण्यासाठी हाहाकार सुरू झाला आहे. महिलावर्ग पाण्यासाठी दूरवर भटकंती करीत असल्याचे चित्र जिवती व कोरपना तालुक्यात पहायला मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)

प्रकल्पातील शिल्लक जलसाठा
आसोलामेंढा प्रकल्पात २८.३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. घोडाझरीत ९.९२ टक्के, नलेश्वर-२.०३ टक्के, चंदई-शून्य टक्के, चारगाव-२.७७ टक्के, अमलनाला-८.८५ टक्के, लभानसराड-शून्य टक्के, पकडीगुड्डम-११.३६ टक्के, डोंगरगाव-१९.६४ टक्के, दिना-शून्य टक्के, इरई-५७.६० टक्के असा जलसाठा शिल्लक आहे.

उद्योगांना हवे पाणी
चंद्रपूर जिल्हा उद्योगांचा जिल्हा आहे. सिमेंट कंपन्या, कोळसा खाणी, स्टिल प्लांट, आयुध निर्माणी, पेपर मील, महाऔष्णिक वीज केंद्र यासारखे अनेक उद्योग जिल्ह्यात आहेत. या उद्योगांनाही आपल्या उत्पादनासाठी पाण्याची गरज पडते. ही गरज उद्योगांकडून जिल्ह्यातील नद्या व सिंचन प्रकल्पातून पुर्ण करतात. त्यामुळे या जलसाठ्यातील पाणी आणखी कमी होत आहे.

Web Title: On the way to the seven projects being dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.