जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळणार

By Admin | Updated: November 11, 2015 00:37 IST2015-11-11T00:37:57+5:302015-11-11T00:37:57+5:30

येथे लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने या विभागाद्वारे राबविली जाणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Watershed Shivar campaign will linger | जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळणार

जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळणार

लघु सिंचन उपविभाग कर्मचाऱ्याविना : शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा डाव
ब्रह्मपुरी : येथे लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने या विभागाद्वारे राबविली जाणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
ब्रह्मपुरी लघु सिंचन (जलसंधारण) उपविभागांतर्गत नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्याचा समावेश आहे. या विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान, कोल्हापुरी बंधारे, सन २०१४ ते २०१९ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. परंतु या विभागात पाच शाखा अभियंता पदे मंजूर असताना केवळ एका शाखा अभियंताच्या खांद्यावर ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्याचा भार आहे. एक शाखा अभियंता कार्यरत असून ३१ जानेवारी २०१६ ला सेवानिवृत्त होत असल्याने केवळ उपविभागीय अधिकारी शिल्लक सेवेत राहणार आहे. म्हणजे पाचही शाखा अभियंत्यांची पदे येत्या काही काळात रिक्त राहणार असल्याने जलशिवार अभियान व कोल्हापुरी बंधारे कसे तयार करावे, असा प्रश्न उपविभागीय अधिकाऱ्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. परंतु दुसरीकडे योजनांची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नसल्याने चारही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करण्याचा डाव रचला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या बैठकीला उपस्थित रहावयचे की शाखा अभियंत्याची कामे करायची, असा मोठा प्रश्न उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यासह अन्य तालुक्याचे मोठे नुकसान शाखा अभियंत्याच्या रिक्त पदांमुळे होत आहे. शाखा अभियंता पदे भरत नसल्याने हे कार्यालयच बंद पाडण्याची योजना केली असावी असाही सूर व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्ष ग्रामीण जनतेशी थेट संबंध येत असल्याने या कार्यालयाला साधे निरीक्षण वाहन कायमस्वरूपी नसल्याने कामांना गती मिळत नाही. शासन अनेक योजना सुरू करताना त्या योजना राबविणाऱ्या यंत्रणेचा पर्यायी विचार न केल्याने किंवा या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकाऱ्यावर काढला जात आहे. शेतकऱ्यांना वरदान ठरणारे जलयुक्त शिवार अभियान व कोल्हापुरी बंधारे शासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन चारही तालुक्यातील रिक्त पदे ताबडतोब भरण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Watershed Shivar campaign will linger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.