जलकुंभाची सुरक्षा ऐरणीवर

By Admin | Updated: June 21, 2016 00:44 IST2016-06-21T00:44:05+5:302016-06-21T00:44:05+5:30

नागरिकांना पाणी पुरवठा करताना पाण्याच्या स्रोतातून पाणी ओढून ते जलकुंभात साठविले जाते.

Watercolor Safety Warning | जलकुंभाची सुरक्षा ऐरणीवर

जलकुंभाची सुरक्षा ऐरणीवर

चंद्रपूर : नागरिकांना पाणी पुरवठा करताना पाण्याच्या स्रोतातून पाणी ओढून ते जलकुंभात साठविले जाते. त्यानंतर ते पाणी नागरिकांना घरोघरी वितरित केले जाते. मात्र या जलकुंभाची व पर्यायाने त्यात साठवणूक केलेल्या पाण्याची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे लोकमतने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आले आहे. अनेक ठिकाणी जलकूंभ बेवारस असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी तर अवैध धंदेही त्या ठिकाणी सुरू असतात.
चंद्रपूर
चंद्रपूर :चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रियदर्शिनी चौक, बंगाली कॅम्प, शास्त्रीनगर, तुकूम, घुटकाळा, पठाणपुरा, बाबुपेठ, महाकाली वॉर्ड, भिवापूर या ठिकाणी पाण्याच्या टाकी आहेत. यातील प्रियदर्शिनी चौक व तुकूम येथे चौकीदार असल्याचे दिसून आले. मात्र उर्वरित सर्वच टाकी सुरक्षेविनाच आहेत. यातील अनेक टाकीवर कुणीही सहज चढू शकतो.
गडचांदूर
गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथे दोन पाण्याच्या टाक्या असून दोन्ही टाक्यांना संरक्षित भिंत नाही व चौकीदारसुद्धा नसल्याने धोका निर्माण झाला आहे. गडचांदूर शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या आसपास असून नगर परिषदेचा दर्जा मिळाला आहे. ४० वर्षांपूर्वी शहरात गांंधीचौकात १ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता दुसरी नवीन टाकी वॉर्ड नं. ५ मध्ये ३० वर्षांपूर्वी बांधली. या दोन्ही टाक्या वाऱ्यावर आहेत.
सिंदेवाही
सिंदेवाही : नगराला पाणी पुरवठा करणारी पोलीस स्टेशन जवळ तीन लाख लिटर तर राममंदिर जवळ १.५० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकली. या पाण्याच्या टाकीची रात्रभर पाहणी करण्याकरिता चौकीदार राहत नाही. केवळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये असलेल्या टाकीजवळ चौकीदार रात्रभर राहतो.

बल्लारपूर तालुक्यात टाक्या रामभरोसे
बल्लारपूर : बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागात १८ नळयोजना कार्यरत आहेत. बल्लारपूर शहराला जीवन प्राधिकरणाच्या नळयोजनेच्या माध्यमातून तर ग्रामीण भागात ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र ग्रामीण भागात पाण्याच्या टाक्या असुरक्षित असून चौकीदार नसल्याने रामभरोसे असल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बल्लारपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेची पााण्याच्या टाकीभोवती सुरक्षा भिंत आहे. या ठिकाणी अहोरात्र कर्मचारी तैनात असतात. मात्र ग्रामीण भागातील पाण्याच्या टाक्या रामभरोसेच आहेत.

व्हॉल्वमन असतो
मात्र पूर्णवेळ नाही
सावली : सावली नगरात १९८९ पासून नळयोजना असित्त्वात आहे. त्यानंतर वाढीव पाणी पुरवठा योजनेला २०१०-११ पासून कार्यान्वित करण्यात आले. सदर दोन्ही जलकुंभाची क्षमता दहा लाख लिटर आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून शुद्ध पाणी नागरिकांना मिळण्याच्या हेतुने १९ गावासाठी जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यातीलच एक जलकुंभ सावली येथे उभारण्यात आले. त्यातूनच सावलीकरांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दोन्ही जलकुंभाच्या सुरक्षिततेसाठी तात्कालिन ग्रामपंचायतीने वॉलमॅन व त्याच्यासाठी परिसरातच एक सदनिका बांधली आहे. मात्र वॉलमनच्या अनुपस्थितीत कधीही धोका निर्माण होवू शकतो. आठवडी बाजार असलेल्या गुरुवारच्या दिवशी मटन, मच्छीचे दुकानदार जलकुंभाच्या परिसरातच बसत असल्याने त्याठिकाणी अस्वच्छता निर्माण होत आहे.

नागभीडचे जलकुंभ वाऱ्यावर
नागभीड : नागभीडला दोन ठिकाणांवरुन पाणी पुरवठा होतो. एक तपाळ पाणीपुरवठा योजनेद्वारा आणि दुसरे नवखळा नाल्यातील विहिरीमधून. तपाळ योजनेचे नागभीडमध्ये एक मोठे जलकुंभ तहसील कार्यालयाजवळ आहे. याठिकाणी एकही व्यक्ती चौकीदारीसाठी नियुक्त नाही. नागभीड नगरपरिषदेच्या कक्षेत दोन जलकुंभ आहेत. पैकी बाजार चौकातील जलकुंभाजवळ रात्री चौकीदार असतोे. मात्र समता कॉलनीतील जलकुंभ बेवारसच आहे. नवखळा नाल्यावरील टाकीसाठी नियमित चौकीदार नियुक्त करण्यात आला आहे.

मूल येथील जलकुंभ झाले जीर्ण
मूल : नगर परिषद मूल येथील बाजार चौकातील ४८ वर्षांपूर्वी नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेले जलकुंभ जीर्ण अवस्थेत असून अत्यंत वर्दळीचे ठिकाण असल्याने धोकादायक ठरण्याची दाट शक्यता आहे. मूल येथे नगर परिषद होण्यापूर्वी ग्रामपंचायत काळात सन १९६८ दरम्यान बाजार चौकात २.७ लक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. ग्रामपंचायत काळात मूलची लोकसंख्या १५ हजारच्या दरम्यान असल्याने एकमेव असलेल्या या जलकुंभातून मूलवासियांना पाणी पुरवठा व्यवस्थित केला जायचा. मूल शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ५ कोटी ७१ लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना अस्तित्वात येऊन वैनगंगा नदीवरुन पाणी पुरवठा करण्याची योजना अस्तित्वात आली. त्यावेळी पुनश्च: दोन जलकुंभ बांधण्यात आले. आज मूल शहराला तीन जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र बाजार चौकातील जलकुंभाला ४८ वर्षाचा कालावधी लोटत असल्याने ते जलकुंभ जीर्ण झाले आहे. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी अनर्थ घडण्याची शक्यता आहे. याशिवाय पाण्याच्या टाकीजवळ कायम सुरक्षा रक्षकही नसल्याचे लोकमतच्या पाहणीतू आढळून आले.
वरोरा तालुक्यातील १०४ पाण्याच्या टाक्या बेवारस
वरोरा : तालुक्यातील ग्रामीण भागात १०३ पाण्याच्या टाक्या असून वरोरा शहरात एक पाण्याची टाकी आहे. १०४ पाण्याच्या टाकीतून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविली जाते. परंतु एकाही पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षक नेमलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असुरक्षित असल्याचे दिसून आले. वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता पाण्याच्या टाक्या, ट्युबवेल, पाईपलाईन टाकली जाते. कामे पूर्ण झाल्यावर त्याचे हस्तांतरण ग्रामपंचायतकडे केले जाते. ग्रामपंचायतमध्ये असलेला एक शिपाई पाण्यावर नियंत्रण ठेवत असतो. काही ग्रामपंचायतीमध्ये शिपाई नसल्यास खासगी व्यक्तीकडे जबाबदारी सोपविली जाते. कुठल्याही पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षक नेमले नाही तर कित्येक पाण्याच्या टाकीला सुरक्षा भिंत नसल्याने कुणीही केव्हाही सहजरीत्या तिथे प्रवेश करू शकतो. अनेक टाक्यांना तर कुलूपही लावलेले दिसले नाही.

Web Title: Watercolor Safety Warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.