सीमेवरील गावांत पाणी प्रश्न पेटला
By Admin | Updated: February 4, 2015 23:11 IST2015-02-04T23:11:03+5:302015-02-04T23:11:03+5:30
महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या चौदा गावांच्या विकासासाठी दोन्ही राज्य कोणतीच भूमिका घेत नाही. आंध्र प्रदेश सरकारने या गावांत काही विकास कामे केले

सीमेवरील गावांत पाणी प्रश्न पेटला
दोन्ही राज्याचे दुर्लक्ष : नागरिकांना त्रास
संघरक्षित तावाडे - जिवती
महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या चौदा गावांच्या विकासासाठी दोन्ही राज्य कोणतीच भूमिका घेत नाही. आंध्र प्रदेश सरकारने या गावांत काही विकास कामे केले असले तरी अनेक कामे ठप्प आहेत.
मुकदमगुडा, परमडोली या गावात आंध्र प्रदेश सरकारने २००२ मध्ये पाण्याची टाकी उभी केली असून याच टाकीद्वारे जलबंब पाणीपुरवठा सुरु आहे. तर महाराष्ट्र सरकारने याच गावात केवळ अर्धवट टाकी बांधून ठेवल्याने ती शोभेची वस्तु ठरत आहे.
जिवती तालुका हा अतिदुर्गम असून पहाडावर वसलेला आहे. या तालुक्याला पाणी टंचाईची झळ दरवर्षी सहन करावी लागत असते. मात्र, महाराष्ट्र शासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. परमडोली, मुकदमगुडा, लेडीजान, शंकरलोधी, कोटा, लेंडीगुडा, भोलापठार, पद्मावती, पळसगुडा, अंतापूर, तांडा, येसापूर, नारायणगुडा, इंदिरानगर हे जिवती तालुक्यातील महाराष्ट्र- आंध्र प्रदेश सीमेवर वसलेली वादग्रस्त गावे आहेत. दोन्ही राज्य ही चौदा गावे आपआपल्या राज्यात असल्याचा दावा करीत असले तरी विकासाच्या बाबतीत ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करुन परमडोली येथे केवळ अर्धवट पाण्याची टाकी महाराष्ट्राने शासनाने बांधली आहे. तर दुसरीकडे याच गावात आंध्र प्रदेश सरकारने २००२ ला पाणी टाकी बांधली. या टाकीद्वारे मुबलक पाणी पुरवठा होत आहे. पाणी टंचाई भासल्यास येथील महिलांना एक ते दोन किमी अंतरावरुन पायपीट करत पाणी आणावे लागते.