लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : गावागावात पाणीपुरवठा योजना भरमसाठ वीज बिलामुळे ठप्प होत आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक टंचाईमुळे पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीज बिलामुळे नळयोजना बंद असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून बल्लारपूर तालुक्यात १२ सौर उर्जेवरील पाणीपुरवठा योजना अंमलात आली. मात्र या योजनाही दुरुस्तीअभावी बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रशासनाच्या वतीने बल्लारपूर तालुक्यात कोठारी, मानोरा, गिलबिली, कळमना, किन्ही, विसापूर, इटोली, पळसगाव व कोर्टी या ग्रामपंचायतीत १२ सौर उर्जा पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गावात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले होते. तसेच ग्रामपंचायतीवर बसणारा वीज बिलाचा भुर्दंड कमी झाला होता. हातपंपावर आधारित या पाणी पुरवठा योजनेमुळे नागरिकांची पाण्याची तहान भागविण्यासाठी मदत झाली होती. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने या योजनेची योग्य देखभाल व दुरुस्ती केली नाही. यामुळे कोठारी, विसापूर, हडस्ती, चारवट, कळमना, किन्ही येथील सौर उर्जेवरील पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. या योजना बंद पडल्याने गावातील महिलांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.सौर उर्जा योजना बंद असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीला करूनही त्या दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्यातील बंद पडलेल्या सौरउर्जा पाणी पुरवठा योजनांची त्वरित दुरुस्ती करून पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील सौर ऊर्जेवरील पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:14 IST
गावागावात पाणीपुरवठा योजना भरमसाठ वीज बिलामुळे ठप्प होत आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक टंचाईमुळे पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीज बिलामुळे नळयोजना बंद असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून बल्लारपूर तालुक्यात १२ सौर उर्जेवरील पाणीपुरवठा योजना अंमलात आली.
बल्लारपूर तालुक्यातील सौर ऊर्जेवरील पाणीपुरवठा बंद
ठळक मुद्देपंचायत समितीचे दुर्लक्ष : गावात पाण्याची भीषण टंचाई