पाणीपुरवठा योजना चार महिन्यांपासून बंद
By Admin | Updated: April 13, 2016 01:20 IST2016-04-13T01:20:38+5:302016-04-13T01:20:38+5:30
येथील अमराई वॉर्डाला पाणीपुरवठा करणाऱ्या ट्युबवेलच्या दुरुस्तीदरम्यान मोटारसह पाईप ट्युबवेलमध्ये पडले.

पाणीपुरवठा योजना चार महिन्यांपासून बंद
घुग्घुस : येथील अमराई वॉर्डाला पाणीपुरवठा करणाऱ्या ट्युबवेलच्या दुरुस्तीदरम्यान मोटारसह पाईप ट्युबवेलमध्ये पडले. तेव्हापासून या योजनेमार्फत अमराई वॉर्डाला होणारा पाणीपुरवठा गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. ग्रामपंचायतीने टूबवेल दुरुस्ती बाबत तत्काळ निर्णय घेण्याची गरज होती. मात्र चार महिने लोटूनही दुरुस्ती करण्यात न आल्याने वॉर्डात पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांची पायपीट सुरू आहे.
घुग्घुस ग्रामपंचायतची पाच लक्ष लिटर क्षमतेची बसस्थानक परिसरात पाणी टाकी आहे. वेकोलिच्या चुकीच्या धोरणामुळे घुग्घुस कॉलरी क्र. २ व घुग्घुस वस्तीच्या मध्ये असलेली पाणी पुरवठा योजना कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लॉस्टिंगमुळे जीर्ण झाली. वर्धा नदीवरुन पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तुटणे, जोडण्याची डोकेदुखी ठरत असल्याने त्या योजनेच्या टाकीचे काही अंतरावर पुनर्वसन करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र नदीवरुन पाईपलाईन टाकण्याची वेकोलिने हरकत घेतल्यामुळे बरेच दिवस पाईपलाईनचे काम रेंगाळत राहिले.
बोअरवेल लावून पाणीपुरवठा करण्याची योजना आखली, पण टाकीत पाणी चढत नव्हते. म्हणून खाली टॅक बनवून मोटार पंंपने पाणी पोहोचविण्याचे काम केले. पण त्यालाही यश आले नाही. त्यामुळे ट्युबवेल खोदण्यात आले. त्यानंतर कशीबशी योजना कार्यान्वित होऊन सुरळीत अमराई वॉर्डाला पाणीपुरवठा सुरू झाला.
पूर्वीच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना चार दिवसांनी वार्डाला होणारा पाणी पुरवठा पाच दिवसांनी होत आहे. पाणी टंचाई असताना बंद ट्युबवेल दुरुस्तीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. नवीन मोटार पंप व पाईप खरेदीला ठराव घेतला असता तरी ग्राम पंचायतीच्या चुकीच्या कामाचा एक दीड लाखांचा फटका बसणार आहे. पाण्याच्या विषय गंभीर होत असला तरी ग्राम पंचायत पदाधिकारी मात्र गंभीरते घेत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)