जीर्ण टाकीतून चिमूरला केला जातो पाणी पुरवठा
By Admin | Updated: February 26, 2015 00:44 IST2015-02-26T00:44:45+5:302015-02-26T00:44:45+5:30
चिमूर येथील शहीद स्मारकाजवळ ४२ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधली. आता ही टाकी जीर्ण झाली असून केव्हा पडण्याच्या स्थितीत आहे. असे असले तरी याच टाकीतून चिमूरवासियांना पाणी पुरवठा केला जात आहे.

जीर्ण टाकीतून चिमूरला केला जातो पाणी पुरवठा
चिमूर : चिमूर येथील शहीद स्मारकाजवळ ४२ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधली. आता ही टाकी जीर्ण झाली असून केव्हा पडण्याच्या स्थितीत आहे. असे असले तरी याच टाकीतून चिमूरवासियांना पाणी पुरवठा केला जात आहे. या पाण्याच्या टाकीला लागून जिल्हा परिषदेची शाळाही आहे. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.
चिमूर येथे १९७२ मध्ये साडेतीन लाख लिटरची पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यावेळची लोकसंख्या लक्षात घेता ही टाकी बांधण्यात आली. या टाकीतून नेहरू वार्ड, आझाद वार्ड, गांधी चौक व गुरुदेव वॉर्डात पाणी पुरवठा केला जातो. टाकी फार जुनी असल्याने टाकी संदर्भात पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायत चिमूर यांच्या वतीने डॉ. एस.एस. कुलकर्णी यांना पत्र देऊन या टाकीचे निरीक्षण करण्यात आले होते. त्यांनी २३ आॅक्टोबर २००८ मध्ये ग्रामपंचायत व पाणी पुरवठा विभागाला पत्र पाठवून ही टाकी जीर्ण झाली असून केव्हाही पडण्याची शक्यता त्यांच्या अहवालातून वर्तविली होती. त्यानुसार चिमूर ग्रामपंचायतीने या संदर्भात ठराव घेऊन सदर पाण्याची टाकी पाडण्यात यावी, असे पत्रही संबंधित विभागाला दिले होते. परंतु यावर अजूनपर्यंत कोणतेही कार्यवाही होऊ शकली नाही.
पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारीही ही टाकी अर्धीच भरतात. त्यामुळे लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या चार वॉर्डात करण्यात येणारा पाणी पुरवठा अत्यल्प असतो. परिणामी येथील नागरिकांची पाण्यासाठी ओरड होते.
उल्लेखनीय असे की या पाण्याच्या टाकीजवळच जिल्हा परिषदेचे पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जीर्ण पाण्याच्या टाकीमुळे या शाळेलाही धोका निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी शाळेवर किंवा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने वारंवार ठराव घेऊन व संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून पाण्याची टाकी पाडण्यास बजाविले आहे. मात्र संबंधित विभागाकडून कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. (शहर प्रतिनिधी)