जिवती तालुक्याला पाणीटंचाईची झळ
By Admin | Updated: April 2, 2015 01:26 IST2015-04-02T01:26:42+5:302015-04-02T01:26:42+5:30
जिवती तालुक्याला पाणीटंचाईची झळ दरवर्षी सोसावी लागत आहे. यावर्षीही हिच परिस्थिती उद्भवली असून तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे.

जिवती तालुक्याला पाणीटंचाईची झळ
जिवती : जिवती तालुक्याला पाणीटंचाईची झळ दरवर्षी सोसावी लागत आहे. यावर्षीही हिच परिस्थिती उद्भवली असून तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या टँकरही पूरवू असे सांगण्यात येते. पण याची मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील माराई पाटण येथील माराई देवीचे तिर्थस्थळी येणाऱ्या भाविकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.
तालुक्यात अनेक गावात पाणी समस्या असली तरी तीर्थस्थान माराई पाटण येथे पैसा द्या, पाणी घ्या हा प्रकार सर्रास सुरू आहे. या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. जवळपास एक महिना ही यात्रा चालत असते. मात्र येथे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यात्रेत एक हंडा पाण्यासाठी २० ते ३० रुपये मोजावे लागत आहे. यात्रेदरम्यान तरी प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. मात्र असे कधीच झालेले नाही.
मंदिराच्या बाजूलाच एक हातपंप असून हा हातपंप यात्रा काळातच बंद आहे. हातपंपाचे हॅन्डल गायब असून भाविकांसाठी तो हातपंप एक देखावाच ठरत आहे. स्थानिक ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी, अशी भाविकांची मागणी आहे. याकडे लक्ष द्यावे. (शहर प्रतिनिधी)