सुमठाणा व सातार्यात पाणी टंचाई
By Admin | Updated: May 29, 2014 02:09 IST2014-05-29T02:09:20+5:302014-05-29T02:09:20+5:30
तालुक्यातील सुमठाणा व सातारा गावातील विहिरी आटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

सुमठाणा व सातार्यात पाणी टंचाई
तालुक्यातील सुमठाणा व सातारा गावातील विहिरी आटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मे महिना सुरु होऊनही प्रशासनाने ठोस उपाययोजना सुरू केली नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. वरोरा शहरातील काही प्रभागात मुबलक पाणी मिळत असल्याने नागरिकांना सहकुटुंब जाऊन दूरवरुन पाणी आणावे लागत आहे. ग्रामीण भागात अनेक गावातील हातपंप बंद असल्याचे तक्रार पुस्तिकेवरुन दिसत आहे. वरोरा तालुक्यातील सुमठाणा गावात गावातीलच विहिरीवरुन नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. या विहिरीमधील पाणी आटत असल्याने नागरिकांना अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत आहे. या विहिरीतील पाणी मे महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण आटल्याने सुमठाणावासीयांना याच उन्हाळ्यात दुरवरुन पाणी आणावे लागत आहे. सातारा गावामध्ये असणार्या विहिरीचे पाणी मागील महिन्यात आटले आहे. याबाबत प्रशासनास स्थानिक प्रशासनाने कळविलेही होते. परंतु अद्याप कुठलीही उपाययोजना प्रशासनाने केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सातारावासीयांना शेतातील विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. उष्णतेचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटणे सुरू झाले आहे. असे असतानाही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरोरा तालुक्यातील जामखुला, टेमुर्डा, बेलगाव, भेंडाळा, तुमगाव, येन्सा, उखर्डा, मुरदगाव, चिकणी, खेमजई, सोनेगाव, पांझुर्णी, बोडखा, पिंपळगाव, मेसा, दादापूर, बोरी, खापरी, जळका, मजरा, आजनगाव आदी गावातील हातपंप नादुरुस्त असल्याच्या तक्रारी पंचायत समितीला प्राप्त झाल्या आहेत. परंतु अद्यापही त्या दुरुस्त करण्यात आल्या नाही. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या फलकावर स्थानांतर्रित झालेल्या अधिकार्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक कायम असल्याने हा विभाग किती तत्पर आहे, हे दिसून येत आहे. वारंवार पाण्यासाठी नागरिकांकडून निवेदने दिली जात असतानाही याकडे पाणी पुरवठा विभाग लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.