अमेरिकेच्या ‘टफ युनिव्हर्सिटी’कडून पाणी नमुन्यांची तपासणी
By Admin | Updated: August 27, 2016 00:29 IST2016-08-27T00:29:40+5:302016-08-27T00:29:40+5:30
टफ युनिव्हर्सिटी युएस, युनिसेफ व निरी नागपूरची चमू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे.

अमेरिकेच्या ‘टफ युनिव्हर्सिटी’कडून पाणी नमुन्यांची तपासणी
चंद्रपूर : टफ युनिव्हर्सिटी युएस, युनिसेफ व निरी नागपूरची चमू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. ही चमू पाणी पुरवठा योजना नसलेल्या व पाणी पुरवठा योजना असलेल्या अशा चार तालुक्यांतील १० गावांमधील पाणी नमुने तपासणी करीत आहे. पाणी नमुन्यांमध्ये आढळलेले दोष दूर करण्यासाठी ही चमू शासनाला अहवाल सादर करणार आहे.
टफ युनिर्व्हसीटी युएस व युनीसेफच्या गॅब्रेला स्टींग, निरी नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. खडसे, सहाय्यक म्हणून सतीश सावळे यांचा या चमूत समावेश आहे. ही चमू दहा दिवस चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील विविध गावांना भेटी देणार आहे. शासनस्तरावरुन चार तालुक्यातील दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आहे व ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नाही, असे गावे निवड करण्यात आलेली आहेत.
या दौऱ्यामध्ये ही चमू प्रत्येक गावात जाऊन प्रथम ग्रामपंचायत मध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष-सचीव व सदस्य , जलसुरक्षक, आशावर्कर तसेच गावकरी यांच्यासोबत चर्चा करुन पाणी वापर कसे करतात, याबाबत विस्तृत माहिती जाणून घेत आहे. त्यानंतर ते गावांमध्ये काही महिलांसोबत चर्चा करून तेथील पाणी नमुने तपासणी केली जात आहे.
घरात पाणी कुठ ठेवता, पाणी कसे वापरता, पाणी केव्हा भरुन ठेवता, पाणी गाळुन घेता का, पाणी स्वच्छ करण्याकरिता घरगुती काही उपाय करता का, जलसुरक्षक व आशावर्कर गावांमधील घरांमध्ये स्वच्छतेबाबत माहिती समजावून सांगतात का तसेच घरातील पाणी कुठे ठेवता, याची सुध्दा घरात जावून पाहणी केली जात आहे. घरातीलच पाणी नमुने जैवीक व रासायनिक तपासणीकरिता घेत आहे. ही चमू सदर अहवाल शासनाला सादर करणार आहे. या चमूसोबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे पाणी गुणवत्ता तज्ञ्ज अंजली डाहुले, माहिती शिक्षण संवाद तज्ञ्ज प्रवीण खंडारे यांचाही सहभाग आहे.
तीन सदस्यांचा समावेश : जिल्ह्यातील दहा गावांमधून घेणार पाणी नमुने
या गावांना देणार भेटी
वरोरा तालुक्यातील शेगाव, दादापूर, नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी, कोसंबळी गवळी, सोनुली, पारडी ठावरे, चंद्रपूर तालुक्यातील निंबाळा, वायगाव आणि जिवती तालुक्यातील चिखल बक, पाटण या गावांना टफ युनिर्व्हसीटी युएस, युनिसेफ व निरीची चमू भेट देणार आहे.
पाणी वापराबाबत मार्गदर्शन
दरम्यान हातपंप, विहीर व पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीचे नमुनेही चमू घेत आहे. लोकांना पाणी वापराबाबत जागरुकता निर्माण करणे, माहिती शिक्षण व संवाद घडवून आणने, हा या चमूचा मुख्य उद्देश आहे. आजही ग्रामस्थ पाणी वापराबाबत जागरुक नसल्यामुळे पाणी कशा कशामुळे दूषित होऊ शकते, याबाबतसुध्दा ही चमू मार्गदर्शन करीत आहे.