जनावरे व नागरिक पितात एकाच नाल्यातील पाणी !
By Admin | Updated: March 17, 2017 00:47 IST2017-03-17T00:47:53+5:302017-03-17T00:47:53+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मौजा मच्छीगुडावासी

जनावरे व नागरिक पितात एकाच नाल्यातील पाणी !
जिवती तालुक्यातील मच्छीगुडा येथील प्रकार : गावात जाण्याकरिता रस्ता नाही, वीज व पाणी समस्या बिकट
फारूख शेख पाटण
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मौजा मच्छीगुडावासी बाराही महिने नाल्यातील पाणी पिऊन जीवन जगत आहे. गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही तर वीज आणि पाणी समस्या बिकट झाली आहे; मात्र या समस्या प्रशासनाला दिसत नसल्याने निद्रीस्त प्रशासन व लोकप्रतिनिधीप्रति गावकऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे.
भारी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मच्छीगुडा या गावात १७ घराची वस्ती असून गावाची लोकसंख्या ६० आहे. गावात शासनाच्या विहिरीचा पत्ता नाही, एक हातपंप आहे. पण तोही गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने येथील नागरिक बाराही महिने जवळील नाल्यातील पाण्यावर आपली तहान भागवित आहेत. नाल्याच्या अशद्ध पाण्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. गावात प्राथमिक शाळेची सोय नसलचयाने ३ कि.मी. अंतरावर असलेल्या भारी येथील शाळेत काही विद्यार्थी जातात. तर अनेक विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. गावात विद्युत खांब उभे करून १० वर्षे लोटली. पण अजूनपर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. गावात २०१५-१६ या वर्षी आवास योजनेअंतर्गत गिरजा मारोती भुतोलू, भीमराव पोचू भुतोलू, चिन्नु राजू नायडू, येलया गडामुल यांना घरकुल मिळाले. मात्र एक वर्षांपासून फक्त पायाभरणीवरच काम थांबले आहे. गावात ग्रामसेवक कधी फिरकलेच नाही. नेते मंडळी केवळ मते मागण्यासाठी गावात येतात. निवडून आल्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीचे गावाला दर्शन होत नाही, अशी प्रतिक्रिया गावातील राजू गुडेगू, भीमू भुतेलू यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिली.