चिमूर नगर परिषदेत विरोधकांचा ‘जल’ आक्रोश
By Admin | Updated: March 11, 2017 00:49 IST2017-03-11T00:49:20+5:302017-03-11T00:49:20+5:30
दोन वर्षाअगोदर अस्तित्वात आलेल्या चिमूर नगर परिषदेत प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक नवखे असले तरी ...

चिमूर नगर परिषदेत विरोधकांचा ‘जल’ आक्रोश
कुक्कुटपालन प्रश्नावरुन सभागृह दोन तास बंद : बांधकामावर विरोधक आक्रमक
चिमूर : दोन वर्षाअगोदर अस्तित्वात आलेल्या चिमूर नगर परिषदेत प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक नवखे असले तरी नियमित होणाऱ्या कामकाजाच्या अनुभवामुळे आता नगरसेवक अनुभवी जनप्रतिनिधी सारखे सभागृह गाजवू लागले आहेत. गुरुवारला नगर परिषद सभागृहात विविध विषयांसह पाणी पुरवठ्यावर सभा घेण्यात आली. या सभेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्याना पाण्याच्या प्रश्नावर धारेवर धरत ज्या प्रभागात पाणी मिळत नाही, त्या भागातील नागरिकांकडून पाणी पुरवठ्याचे बिल वसुल करण्यात येऊ नये, असा ‘जल’ आक्रोश करीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
नगराध्यक्ष शिल्पा राचलवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नगर परिषद सभागृहात विविध विषयांवर मासीक सभा घेण्यात आली. उन्हाळ्याची चाहूल लागताच चिमूर नगर परिषदेअंतर्गत प्रभाग क्रमांक एक ते पाच व प्रभाग क्रमांक १७ मधील महाकाली नगरी, साईनगर, काडकुडनगर, सोनेगाव सिरास, कवडशी, केसलापूर, क्रांतीनगर या प्रभागातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे टँकरद्वारे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. तेव्हा आत्ताच या प्रभागात पाणी पुरवठ्याचे नियोजन सभागृहाने करावे तथा पाणी पुरवठा सभापती पद अनेक महिन्यापासून रिक्त आहे. ते पद तातडीने भरावे या मागणीसह सभागृहात विरोधी गटनेता कदीर शेख, विनोद ढाकुनकर, सतीश जाधव, उमेश हिंगे, तुषार काळे आदी नगरसेवकांनी सभागृहात हंगामा केला.
नगरपरिषद क्षेत्रात होत असलेल्या नाली बांधकाम, सिमेंट रोड बांधकामात अनियमीतता असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नगर परिषदेच्या नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याने बांधकाम नगर परिषदच्या मार्फतीने करण्याची मागणीही विरोधकांनी सभागृहात लावून धरली असता नगराध्यक्षा शिल्पा राचलवार यांनी निकृष्ट बांधकामासंदर्भात विरोधकांना उत्तर देताना बांधकाम अभियंता कंत्राटदार आणि नगरसेवक यांची संयुक्त बैठक बोलविण्याचे सभेत सांगितले. नगर परिषदेचे बांधकाम अभियंता गुप्ता यांचा पदभार काढून पाणी पुरवठा अभियंता नरपाते यांच्याकडे प्रभार देण्याची मागणी गटनेता कदीर शेख यांनी सभागृहात केली.
नगर परिषद अध्यक्षासाठी असणाऱ्या वाहनाचा उपयोग प्रशासनासाठी होत नसल्याचा आरोप विरोधकांनी करीत या सत्रात वाहनासाठी निविदा काढण्यात येवू नये, असा ठराव सभागृहात घेण्यात आला. यासह अनेक विषयावर नगर परिषदेची मासिक सभा विरोधनी आक्रमक होवून सभागृह गाजविले.
विरोधी सदस्यामध्ये काँग्रेसचे नगरपरिषद गटनेता कदीर शेख, विनोद ढाकुणकर, अॅड. अरुण दुधनकर, कल्पना इंदुरकर, गोपाल झाडे, श्रद्धा बडे यांच्यासह माजी सभापती तुषार काळे, सतीश जाधव, सीमा बुटले, उमेश हिंगे यांनीही सभागृह गाजविले. (प्रतिनिधी)
कुक्कुटपालनाच्या विषयावर सभागृह पाडले बंद
नगरपरिषद हद्दीत केसलापूर प्रभागाजवळ असलेल्या कुक्कुटपालन केंद्राच्या दुर्गधीमुळे केसलापूरवासी नागरिकांना (कवडशी) दुर्गंधीचा त्रास होत होता. त्यामुळे हे कुक्कुटपालन बंद करण्याची नागरिकांनी मागणी केली होती. त्यामुळे आजच्या सभेत हे कुक्कुटपालन बंद करण्यासाठी नगरसेवक उमेश हिंगे आक्रमक होत दोन तास सभागृह बंद पाडले; मात्र उमेश हिगेच्या मागणीपुढे सभागृहाला झुकते घ्यावे लागले व प्रशासकीय कारवाईच्या मार्गाने हे कुक्कुटपालन बंद करण्याचे सभागृहात ठरविण्यात आल्याचे विरोधकांनी सांगितले.