कंपनीने राख टाकल्याने तलावातील पाण्याचा प्रवाह थांबला
By Admin | Updated: September 27, 2015 00:44 IST2015-09-27T00:44:35+5:302015-09-27T00:44:35+5:30
तालुक्यातील मरेगाव स्थित ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर निघणारी राख चक्क जिल्हा परिषदेच्या सिंचाई ...

कंपनीने राख टाकल्याने तलावातील पाण्याचा प्रवाह थांबला
शेतकऱ्यांच्या शेताला पाणी बंद : परिसरात प्रदूषण वाढले
मूल : तालुक्यातील मरेगाव स्थित ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर निघणारी राख चक्क जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या तलावात टाकल्याने शेताकडे जाणारा पाण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पोहचणे बंद झाले आहे. तसेच राखेमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. याबाबत मरेगावच्या नागरिकांनी आमदार शोभाताई फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
मूल तालुक्यातील मरेगाव, आकापूर या गावालगत अनेक उद्योग कार्यरत आहेत. तसेच उद्योगासाठी जवळपास सर्वच जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. परिसरात उद्योग येत आहेत, ही चांगली बाब असली तरी उत्पादनानंतर निघणाऱ्या राखीची विल्हेवाट लावणे हेही तेवढेच महत्त्वाचे काम आहे. येथील ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर राख टाकण्यासाठी बाबुराव लिंगा पेंदोर व इतर जणांकडून करारनाम्यानुसार जागा भाड्याने घेतली. वास्तविक सदर जागा शासकीय वाटपात मिळाली असल्याने भाड्याने देता येत नाही. असे असतानादेखील भाड्याने जागा घेऊन कंपनीने राख टाकण्यास सुरूवात केली. राख एवढ्या मोठ्या प्रमाणात टाकली गेली की जवळच असलेल्या जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या तलावातील नहरातसुद्धा पसरली आहे. त्यामुळे तलावातील पाण्याचा प्रवाह बंद झाला. या राखेमुळे प्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जवळच्या शेतकऱ्यांना या राखेमुळे शेती करणे कठीण झाले आहे. गावातील नागरिकांनी आमदार शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन माहिती दिली. यावेळी फडणवीस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, राकेश रत्नावार आदींनी तलावाची पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)