कचऱ्याचा घोटाळा पुन्हा चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2015 00:44 IST2015-09-08T00:44:41+5:302015-09-08T00:44:41+5:30
चंद्रपूर महानगरपालिका नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. रस्त्याचे बांधकाम असो, पाणी पुरवठा असो की भूमिगत मलनिस्सारण योजना असो,...

कचऱ्याचा घोटाळा पुन्हा चव्हाट्यावर
मनपा वर्तुळात खळबळ : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. रस्त्याचे बांधकाम असो, पाणी पुरवठा असो की भूमिगत मलनिस्सारण योजना असो, मनपाचे प्रत्येक काम वादातच अडकत असल्याचा अनुभव आता चंद्रपूरकरांना नित्याचा झाला आहे. काही दिवस शांत असलेला कचरा घोटाळ्याचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याची मनपाची योजना आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात पोहचली आहे. या योजनेत नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.
गेल्या आठ महिन्यापासून चंद्रपूर महानगरपालिकेचे घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे प्रकरण चंद्रपुरात गाजत आहे. आतातर सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन (सीडीसी) शाखा नागपूरला अधिक दराने कचरा संकलनाचे काम देण्यात आले असून हे कंत्राट रद्द करून निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी घनश्याम वासेकर, जगन्नाथ माडेकर आणि काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी न्यायालयाचा दरवाना ठोठावला आहे. या तिघांची संयुक्त याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे.
घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे कंत्राट सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन देताना मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. सन २०१३ मध्ये स्वच्छतेसबंधी झालेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर शहर महाराष्ट्रात १३ व्या क्रमांकावर होते. शहरातील कचरा उचलण्याचे काम सहा महिण्यापूर्वीपर्यंत बचतगटांकडे होते. त्यावेळी १८८ बचतगटातील महिलांना प्रति महिना हजार रुपये दिले जात होते. आता नव्या दरानुसार प्रतिमहिना २४ हजार रुपये दिले जात आहे. कचरा उचलण्यासाठी १० गाड्या असून प्रत्येकी ८४ हजार रुपये दिले जात आहेत. म्हणजेच बचत गट महिला आणि कचरा उलचणाऱ्या गाड्या मिळून महिन्याला ५३ लाख ५२ हजार रुपये या कंत्राटी कंपनीकडे दिले जात आहे. मात्र, कंपनीकडून महिलांना महिन्याकाठी २४ हजार रुपये न देता सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. कचरा संकलनाच्या निवेदनासंबंधी महानगरपालिकेच्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावर कोणतीही चर्चा न करता आयुक्त सुधीर शंभरकर यांनी कंपनीचे संचालक कमलेश शर्मा आणि आरती पुरोहित यांच्याशी शासकीय विश्रामगृहात आ. नाना शामकुळे यांच्या उपस्थितीत चर्चा केली आणि चुकीचे निगोसेशन केले असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी अवाजवी दराने सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशनला घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे कंत्राट दिल्याचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. मनपाच्या आमसभेतही चांगले वादळ उठले होते.(शहर प्रतिनिधी)
यापूर्वीच होते कचरा उचलण्याचे कंत्राट
सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन कंपनीला घराघरातून कचरा संकलन करण्याचे कंत्राट देण्यापूर्वी शहरातील कचरा उचलून तो डम्पींग यार्डवर टाकण्याचे कंत्राट याच सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन कंपनीला देण्यात आले होते. हे काम सुरूच आहे. सदर कंत्राट सुरू असताना पुन्हा नाहक घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी एवढा अवाढव्य खर्च का करण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.