वासेनीरा तलाव फुटण्याच्या स्थितीत
By Admin | Updated: July 3, 2015 01:20 IST2015-07-03T01:20:03+5:302015-07-03T01:20:03+5:30
राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा-खातोडा जंगलात असलेल्या वासेनीरा तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे.

वासेनीरा तलाव फुटण्याच्या स्थितीत
सिंचनाचा प्रश्न : तलाव दुरुस्त करण्याची मागणी
पेंढरी (कोके): राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा-खातोडा जंगलात असलेल्या वासेनीरा तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे. यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार असून याकडे लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाने लक्ष देऊन तलाव दुरूस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.
सिंदेवाही-चिमूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सरांडी-गोंदेडा गावालगत ताडोबा जंगलात वासेनीरा तलाव आहे. या तलावाच्या भरवशावर खातोडा, वडसी, गोंदेडा, केवाडा वाघेडा येथील शेतकरी अवलंबून आहेत. तसेच या तलावातील पाण्यावर पेंढरी (कोके) केवाडा (पेठ) गोंदोडा येथील मच्छीमार अवलंबून आहेत.
परंतु सततच्या पावसामुळे या तलावाच्या पाळीला जिकडे तिकडे भोक पडल्यामुळे पाणी बाहेर जात आहे. या पाण्यासोबतच मासे बाहेर जात असल्यामुळे त्यावर उपजिविका करणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तलाव दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तलावाच्या पाण्यावर अनेक शेतकरी अवलंबून असून तलावाची दुरूस्ती न झाल्यास शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तरी संबधीत विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन तलावाची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)