शेतकऱ्याची न्यायासाठी भटकंती
By Admin | Updated: January 24, 2015 22:51 IST2015-01-24T22:51:55+5:302015-01-24T22:51:55+5:30
येथील विनायक विठू निमगडे यांच्या सावतडा रिठ येथील शेत सर्व्हे क्रमांक ४२ मधून बेकायदेशीररीत्या पांदण रस्त्याचे काम २० नोव्हेंबर २०१२ ला स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत झाले आहे.

शेतकऱ्याची न्यायासाठी भटकंती
शेतातून बळजबरीने रस्ता : शेतकऱ्यावर अन्याय
गेवरा : येथील विनायक विठू निमगडे यांच्या सावतडा रिठ येथील शेत सर्व्हे क्रमांक ४२ मधून बेकायदेशीररीत्या पांदण रस्त्याचे काम २० नोव्हेंबर २०१२ ला स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत झाले आहे. काम सुरू असताना शेतकऱ्याने तलाठी रेकॉर्डनुसार जुना पांदण रस्ता सर्व्हे नं. ८८ मध्ये काम करण्याची विनंती केली. मात्र, तत्कालीन ग्रामसेवकाने शेतकऱ्यांची न ऐकता शेतीतून रस्ता तयार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरु असून याकडे मात्र, कोणताही अधिकारी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्याला पीक घेण्यासापासून वंचित राहावे लागत आहे.
पीडित शेतकऱ्याने अनधिकृत रस्ता बांधकामाची लेखी तक्रार संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदार यांना तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. मात्र, कोणतीच कार्यवाही न झाल्याने पीडित शेतकऱ्याने मानव अधिकार आयोगाकडे दाद मागितली. तेव्हा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या सुनावणीत जाब विचारले. तेव्हा तत्कालीन उपजिल्हाधिकारी मग्रारोहयो नान्हे यांनी शेतकऱ्याला उलट वेटीस धरुन झालेले काम योग्यच असल्याचा आव आणून कैफियत फेटाळून लावली.
शेवटी विनायक निमगडे यांनी तक्रार निवारण अधिकारी, रोहयो चंद्रपूर यांच्याकडे १८ नोव्हेंबर २०१३ रोजी तक्रार दाखल केली. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २६ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती सावली येथे तक्रार निवारण प्राधिकारी (मनरेगा) चंद्रपूर यांनी प्रत्यक्ष सुनावनी घेतली. त्याबाबतचा निर्णय देऊन पत्रान्वये संबंधित यंत्रणेला कळविले.
सुनावणीदरम्यान पीडित शेतकऱ्याने मूळ पांदण रस्ता सर्व्हे नं. ८८ सोडून सर्व्हे नं. ४२ मधून (खासगी) मातीकाम केल्याने ०.४० हेआर जमिनीचा मोबदला द्यावा व झालेल्या कामाची चौकशी करुन न्याय मागीतला. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. (वार्ताहर)