बोरमाडा ते वैनगंगा नदी घाट रस्त्याची दैनावस्था
By Admin | Updated: March 13, 2015 01:04 IST2015-03-13T01:04:40+5:302015-03-13T01:04:40+5:30
मग्रारोहयो अंतर्गत बोरमाळा पासून वैनगंगा नदीघाटापर्यंत अंदाजे अडीच किलो मीटरचा रस्ता सन २०१०-११ या वर्षीपासून योग्य बांधकामाअभावी रखडून पडला आहे.

बोरमाडा ते वैनगंगा नदी घाट रस्त्याची दैनावस्था
गेवरा: मग्रारोहयो अंतर्गत बोरमाळा पासून वैनगंगा नदीघाटापर्यंत अंदाजे अडीच किलो मीटरचा रस्ता सन २०१०-११ या वर्षीपासून योग्य बांधकामाअभावी रखडून पडला आहे. सदर रस्त्याच्या कडेला तीन ते चार वर्षापासून गिट्टी, मुरुमाचे ढग टाकून ठेवलेले आहेत. पहिला कोट बोल्डर टाकून थातूर-मातूर मुरमाचा मुलामा देण्यात आला. तेव्हापासून ग्रामपंचायतीने रस्त्याचे पुढील काम केले नाही.
ग्रामपंचायतीने या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामपंचायतीने सदर कामासाठी पुरवठा धारक कंत्राटदाराला साहित्य पुरवठ्याच्या नावाखाली संपूर्ण काम पूर्ण करण्याचे कंत्राट दिले. परंतु स्थानिक मजुरांना या ठिकाणी अल्प मजुरी दिली जात आहे. लागूनच असलेल्या गडचिरोली शहरात यापेक्षा अधिक मजुरी मिळत असल्याने मजूर या कामावर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. मग्रारोहयोच्या कामातील मजुरी मध्ये बरीच तफावत असल्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतीस मजुरांचा अभाव जाणवू लागला. त्यामुळे सदर रस्त्याचे पुढील बांधकाम होण्यास अडथळा निर्माण झाल्याचे सरपंच व कंत्राटदाराने यांनी सांगितले.
मग्रारोहयो कायद्यातील नियमाप्रमाणे कामाच्या ठिकाणी मजुरांची उपलब्धता नसल्यास पाच किलोमीटरच्या परिसरातील मजुरांना कामावर ठेवून उचित दस्ताऐवजांमध्ये योग्य नोंदी घेवून काम पूर्णत्वास आणता येणे शक्य होते.
परंतु तशा प्रकारचा कोणताही प्रयत्न बोरमाळ ग्रामपंचायतीने केला नाही. परिसरात अनेक रस्त्यांच्या कामावर परिसरातील मजुरांव्यतिरिक्त बोहरुन मजूर आयात करुन सर्रास मग्रारोहयोचे नियम धाब्यावर बसविल्या जात आहे. याला बोरमाळा ते नदीघाट रस्ता अपवाद ठरत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सदर रस्ता हा पंचक्रोशितील अत्यंत महत्वाचा रस्ता असून येथून गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. याच रस्त्याने मोठ्या संख्येने मजूर, शेतकरी, भाजी विक्रेते, दुधविक्रेते, तूप, दही, आदी विक्रीसाठी वैनगंगा नदी पार करून जातात.
यातील काही लोक पायदळ तर काही सायकलीने जातात. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने त्याचा मोठा त्रास सहन नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.(वार्ताहर)