पावले चालती जोगापूरची वाट !
By Admin | Updated: December 19, 2015 00:50 IST2015-12-19T00:50:12+5:302015-12-19T00:50:12+5:30
मनाला मोहून टाकणारी घणदाट वनराई आणि निसर्गरम्य वातावरणात असलेले जोगापूरचे हनुमान मंदिर आहे.

पावले चालती जोगापूरची वाट !
यात्रास्थळी सुविधा पुरविण्याची गरज : मार्गशिर्ष प्रतिपदेपासून यात्रेला प्रारंभ
शाहु नारनवरे विरूर (स्टे)
मनाला मोहून टाकणारी घणदाट वनराई आणि निसर्गरम्य वातावरणात असलेले जोगापूरचे हनुमान मंदिर आहे. मार्गशीर्ष प्रतिप्रदेपासून शनिवार व सोमवारला येथे मोठी यात्रा भरते. या पार्श्वभूमीवर ‘पावले चालती जोगापूरची वाट’ याची प्रचिती येते.
तसेच भाविक आपल्या सोयीनुसार आठवड्यातून कोणत्याही दिवशी देवदर्शनाला जातात. महिनाभर भाविकांची व यात्रेकरूची गर्दी असते. म्हणून या जोगापूरच्या यात्रेला फार महत्वाचे मानले जाते. राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) पासून उत्तरलेला सात किमी अंतरावर जोगापूरचे देवस्थान आहे. येथे राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, बल्लारपूर, चंद्रपूर यासारख्या मोठ्या शहरातून तसेच विरूर व परिसरातील सर्वच भागातील खेड्यापाड्यातून या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. देवदर्शनाला येणारे भाविक बैलबंडी, रेंगी, सायकल मोटार, जीप, कमांडर, ट्रक, एस.टी., ट्रॅक्टर आदी वाहनांनी येताना दिसतात. काही भाविक आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी पायदळसुद्धा दर्शनाला येतात.
जोगापूर हनुमान मंदिर परिसरात एक ते सव्वा महिन्यापर्यंत दुकाने थाटली जातात. त्यात हॉटेल, खेळणीचे दुकान, पानटपरी, किराणा, भाजीपाला आदी किरकोळ दुकाने असतात. काही दुकाने तर एक महिनाभर मुक्कामाला असतात. यात्रेला भाविकांची गर्दी वाढत असल्याने दिवसेंदिवस दुकानात वाढ होत आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेच्या भरवश्यावर त्यांच्या पोटाची खळगी भरली जाते. मात्र हे सर्व करताना त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे.
जोगापूर या ठिकाणी सात हनुमानाची मूर्ती असल्याचे काही वृद्ध लोकांनी सांगितले. परंतु त्यातील आता फक्त दोनच हनुमानाच्या मूर्ती अस्तित्वात आहेत. बाकीच्या मूर्ती गुप्तधनाच्या लालसेने काही समाजकंटकांनी नाहीसे केल्याचे कळते. आता अस्तित्वात असलेले दोन्ही हनुमानाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. श्रद्धाळु नवस ठेऊन पूजा पाठ करतात. त्यामुळे जोगापूर यात्रेचे आपसुकच महत्व वाढले आहे. परंतु मागील काही वर्षापासून या यात्रेला वेगळेच रुप आले आहे. तालुक्याला लाभलेला हा धार्मिक वारसा अस्ताला जातो की काय, याची खंत भक्तगणाला वाटू लागली आहे. यात्रेच्या ठिकाणी धार्मिक स्थळी अवैध दारू, अवैध जुगार, तीन पत्ते खेळण्याचा प्रकार वाढला आहे. याकडे पोलीस यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या जोगापूर देवस्थान स्थळी जाण्याकरिता रस्त्याची फार बिकट परिस्थिती झाली असून दुचाकी, चारचाकी वाहनांना तसेच पायी चालणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने भाविक यात्रेला जाण्याचे टाळतात. त्यामुळे राजुरा तालुक्यातील जोगापूरच्या हनुमान देवस्थानाला शासनाने पर्यटनाच्या दृष्टीने निगा राखण्याची गरज निर्माण झाली आहे. विरूर - जोगापूर - राजुरा या मार्गाचे डांबरीकरण करावे. जेणेकरून भाविकांना दर्शनाला जाण्यासाठी सुलभ होईल. तसेच होत असलेल्या अवैध धद्यांना आळा बसवून या स्थळाला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याची गरज आहे.