वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2015 01:27 IST2015-08-29T01:27:48+5:302015-08-29T01:27:48+5:30

वेकोलिशी संबंधित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांशी निगडित समस्या, न्यायोचित मागण्या तसेच वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत...

Wakoli project affected people get compensation | वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला

वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला

एकोणा-२ खाण : शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याकरिता समितीचे होणार गठण
चंद्रपूर : वेकोलिशी संबंधित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांशी निगडित समस्या, न्यायोचित मागण्या तसेच वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत असलेल्या एकोणा- २ या वेकोलि प्रकल्पाशी संबंधित बाबींवर केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करून प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर येथील रविभवनात पार पडलेल्या या बैठकीमध्ये ना. हंसराज अहीर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांकडून अनेक प्रश्न, नोकरीविषयक प्रश्न, नवीन प्रकल्प व त्यांची अद्ययावत स्थिती, चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या अनेक मुद्यांच्या सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत एकोणा-२ या प्रकल्पातील प्रकल्ग्रस्तांच्या शेतजमिनीचा मोबदला येत्या १५ सप्टेंबर पर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल इंडियाच्या नवीन दरानुसार एकोणा प्रकल्पाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांना ८३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या बरोबरच वेकोलि प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदे देऊन नोकरीत सामावून घेण्याकरीता समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आगामी दोन महिन्यात ही समिती अहवाल सीआयएलला सादर करेल व त्यावर सीआयएल प्रबंधन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा यांनी दिली.
कलर ब्लाईडनेसमुळे नोकरी नाकारण्याच्या प्रश्नावर हंसराज अहीर यांनी नाराजी व्यक्त करुन प्रकल्पग्रस्तांवरील अशा प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांनी कलर ब्लाईडनेसमुळे कुणालाही नोकरीपासून वंचित ठेवले जाणार नसून त्यांना गट ‘ब’ मध्ये नोकरी दिली जाईल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांना दिले.
या बैठकीत वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा तसेच मुख्यालयातील अनेक विभागाचे अधिकारी, भाजपाचे चंद्रपूर जिल्हा सचिव राहुल सराफ, भाजपा किसान आघाडीचे जिल्हा महामंत्री राजू घरोटे, अंकुश आगलावे, पवन एकरे, डायरेक्टर टेक्निकल मल्ली, जनरल मॅनेजर एल अ‍ॅन्ड आर आझमी, जनरल मॅनेजर आय.आर. साहू तसेच वेकोलि प्रकल्पग्रस्ताचे प्रतिनिधी व प्रकल्पामुळे बाधित शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Wakoli project affected people get compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.