अत्याधुनिक सभागृहाची डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा
By Admin | Updated: August 13, 2016 00:29 IST2016-08-13T00:29:38+5:302016-08-13T00:29:38+5:30
नागपूर मार्गावर अत्याधुनिक सुविधांनी सुज्ज अशा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचे काम युद्ध स्तरावर असून ...

अत्याधुनिक सभागृहाची डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा
नागपूरपेक्षाही आधुनिक सुविधा : आर्ट गॅलरीचे काम पूर्ण
चंद्रपूर: नागपूर मार्गावर अत्याधुनिक सुविधांनी सुज्ज अशा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचे काम युद्ध स्तरावर असून हे सभागृह चंद्रपूरकरांच्या सेवेत डिसेंबर महिन्यापर्यंत रूजू होणार आहे. सभागृहाच्या तळघरामध्ये कला दालनाचे काम पूर्ण झाले आहे. सभागृहाच्या बाहेरील भागाला नवा लूक देण्यात येत आहे. याशिवाय महिलांकरिता तळमजल्यावर नव्याने स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. आगीपासून संरक्षणासाठी आधुनिक अग्निशमन सुविधा केली जाणार आहे.
चंद्रपुरातील एकमेव प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाची दुर्दशा झाली होती. शहरातील कलावंत आणि साहित्यिकांकरिता दुसरे चांगले स्थान नाही. त्यामुळे सभागृहाच्या नूतनीकरणाची मागणी होती. सभागृहाची दुर्दशा पाहून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. आधुनिकीकरणाचे काम नागपूर येथील कॉन्सेप्ट इन्फ्राटेक प्रा. लि.कडे सोपविण्यात आले आहे. गेल्या महिन्यांपासून सभागृहाचे अत्याधुनिकीकरण करण्यात येत आहे. आधुनिकीकणावर ३ कोटी ७४ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत.
सभागृहाचा आत्मा असलेला स्टेज आता स्वयंचलित राहणार आहे. पूर्वी स्टेजचा पडदा हाताचे उघडावा लागत असे. त्याची गरज आता राहणार नाही. नाटकासाठी विंग्ज तयार करण्यात येत आहेत. तसेच स्टेज फिरता करण्यात येत आहे. मागे-पुढे होणाऱ्या आरामदायक पुशबॅक खुर्च्या लावण्यात येत आहेत. त्यामुळे पेक्षक सतत तीन तास खुर्चीत बसून असला तरी त्याला थकवा जाणवणार नाही. संपूर्ण सभामृह वातानूकुलित राहणार आहे. दर्शनी भाग आधुनिक पद्धतीने सजविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
स्त्रियांसाठी नवीन स्वच्छतागृह
सभागृहाच्या आत स्त्री-पुरूषांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येत आहे. तेदेखील अत्याधुनिक राहणार आहे. पाणी टाकण्यासाठी स्वयंचित यंत्र बसविण्यात येत असून आपोआप पाणी सोडले जाऊन बंद होईल. त्यातून पाण्याची बचत होणार आहे. याशिवाय तळमजल्यावर स्त्रियांकरिता अतिरिक्त स्वच्छतागृहाचे बांधकाम नव्याने करण्यात येत आहे.
कला दालनात गोंड संस्कृती
सभागृहाच्या आधुनिकीकणासह जिल्ह्यातील कलावंतांसाठी स्वतंत्र कला दालन (आर्ट गॅलरी) तळघरात करण्यात आले आहे. त्यावर अतिरिक्त ४० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्हा गोंडवाना संस्कृतीचा प्रभाव असल्याने आर्ट गॅलरीमध्ये गोंडवाना संस्कृती कायम राखण्यात येणार आहे. रंगकाम आणि इतर साहित्य गोंड संस्कृतीशी निगडीत राहणार आहे. कला दालनात एक सभागृह असून दुसऱ्या एका स्वतंत्र कक्षात कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करता येईल.
पार्किंगची व्यवस्था
सभागृहाचे आधुनिकीकरण करताना पाकिंगच्या व्यवस्थेकडे जातीने लक्ष देण्यात आलेले आहे. चंद्रपुरात पार्किंगची समस्या तीव्र आहे. कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याकरिता येणाऱ्या प्रेक्षक व श्रोत्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे. त्याकरिता कार, मोटारसायकल आणि सायकल यांची पार्किंग करण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. सभागृह परिसरात अलॉटेड पार्किंग राहणार आहे.
चंद्रपूर शहरात अनेक साहित्यिक, कलावंत आहेत. झाडीपट्टी नाट्य कलावंतांसाठी आधुनिक सुविधायुक्त सभागृह शहरात असावे, असे पालकमंत्र्यांना वाटत होते. त्यांच्या सूचनेनुसार, अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. हे सभागृह नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहाच्या एक पाऊल पुढे राहणार आहे.
-उदय भोयर,
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर.