कांदा उत्पादक शेतकरी गोदामाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: May 18, 2015 01:11 IST2015-05-18T01:11:25+5:302015-05-18T01:11:25+5:30
तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतले असून कांदा साठवणूक करण्यासाठी त्यांचेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने ...

कांदा उत्पादक शेतकरी गोदामाच्या प्रतीक्षेत
पोंभुर्णा : तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतले असून कांदा साठवणूक करण्यासाठी त्यांचेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने ओल्या कांद्याची कवडीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. त्यासाठी कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी गोदामाची व्यवस्था करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी, बल्लारपूर, आष्टा, सोनापूर, देवाडा खुर्द आदी गावांमध्ये बऱ्याच प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. उत्पादन झाल्यानंतर त्यांंना सुकविण्यासाठी गोदामाची आवश्यकता असते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने ते आपल्याकडे असलेल्या मोजक्या जागेमध्ये कांदे वाळवितात. त्यामुळे कांद्याला पाहिजे तशी पूरक हवा मिळत नाही. परिणामी कांदे सडतात. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत असते. या त्रासाला कंटाळून अनेकांनी कांदा उत्पादन घेणे टाळले होते. परंतु कृषी विभागामार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करण्यासाठी ५० टक्के अनुदानावर गोदाम उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आणि गोदामासाठी अनुदान मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांच्याकडे संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केले. त्यांनी ते आपल्या स्तरावरुन वरिष्ठांकडे पाठविले. परंतु आजतागायत सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनसुद्धा गोदाम बांधकाम करण्याच्या अनुदानावर कुठलाच शिक्का मोर्तब न झाल्याने उत्पादीत झालेला कांद्याची साठवणूक कुठे साठवणूक करावी, यासाठी परिसरातील शेतकरी संभ्रमात सापडला आहे.
एकीकडे केवळ धान पीक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु आर्थिक अडचणीमुळे पाहिजे त्या प्रमाणात त्यांना सोयी-सुविधा मिळत नसल्याने कष्टकरी ग्रामीण शेतकरी अधोगतीला जात आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गोदामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनधी)
ंपोंभुर्णा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोदाम बांधकाम करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात अनुदानासाठी अर्ज केलेला आहे. त्याचे सर्व प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आले आहेत.
- भास्कर गायकवाड
तालुका कृषी अधिकारी, पोंभुर्णा