नांदा ग्रामवासीय प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रतीक्षेत
By Admin | Updated: July 17, 2017 00:45 IST2017-07-17T00:45:09+5:302017-07-17T00:45:09+5:30
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले नांदा हे गाव ओद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आले आहे.

नांदा ग्रामवासीय प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रतीक्षेत
ओ.पी.डी. सुरु करण्याची मागणी : जागेच्या परवानगीअभावी बांधकाम रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
आवारपूर : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले नांदा हे गाव ओद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आले आहे. कारखान्यांमुळे आपल्या पोटाची खडगी भरण्याकरिता या परिसरात बाहेर गावून तसेच पर राज्यातून अनेक नागरिक आले आहेत. यामुळे दिवसेंदिवस या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. गावाची लोकसंख्या पंधरा हजार आहे. मात्र येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. तीन वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळूनही ग्रामवासीयांना त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
गावाची बाजारपेठ मोठी असल्याने परिसरातील इतर गावातील नागरिक खरेदी विक्रीसाठी येत असतात. तसेच उद्योग समूह गावाला लागूनच असल्याने मालवाहू ट्रक, दुचाकी, चारचाकी तसेच इंग्रजी विद्यालये, महाविद्यालय असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची सततची वर्दळ असते. किरकोळ अपघात रोजच होत असतात. अपघात झालेल्या रूग्णास प्रथमोपचार करून त्यांना ८ किमी अंतरावर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र गडचांदूर येथे पाठवावे लागते. अथवा खासगी दवाखान्यात उपचार करावा लागतो. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही नागरिकांचा बळीसुद्धा गेला आहेत. अपघात झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यास खासगी दवाखान्यात टाळाटाळ केली जाते.
त्यामुळे पुढील उपचाराकरिता नेताना वाटेतच रुग्ण दगावल्याच्या बरेचश्या घटना घडल्या आहेत. गोरगरीब जनतेला महागडा उपचार परवडण्याजोगा नाही. पावसाळ्यात तर मलेरिया, चिकन गुनिया, गॅस्ट्रो, टायफाईड, यासारख्या आजाराची लागण होत असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात या आजारांवर कमी पैशात चांगले उपचार होत असतात. त्यामुळे गावात ओ.पी.डी. सुरु करून गोरगरिबाना आरोग्य सेवा द्यावी, अशी मागणी नांदा ग्रामवासीयांनी केली आहे.