तीन हजारावर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: February 28, 2015 01:19 IST2015-02-28T01:19:25+5:302015-02-28T01:19:25+5:30
२०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.

तीन हजारावर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
चिमूर : २०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. आज ना उद्या मदत मिळेल या आशेवर चिमूर तालुक्यातील शेतकरी जगत आहे. मात्र त्यांना केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. यावर्षी दुष्काळीस्थिती आहे, अशावेळी शेतकऱ्यांना जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आतातरी शासनाने मदत द्यावी, अशी मागणी आहे.
चिमूर तालुक्यात २०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील २७ हजार २४३ शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी मदत जाहीर केली. मात्र यातील ३ हजार २७८ लाभार्थ्यांना अद्यापही नकसान भरपाई मिळाली नाही. विशेष म्हणजे, २३ हजार हजार शेतकऱ्यांना १३ कोटी साठ लाख रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले. मग उर्वरित शेतकऱ्यांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज घेऊन हंगाम केला. मात्र यावर्षीही निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्यात आहे. यावर्षी उत्पन्न कमी झाले त्यातच भावही कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पुढील हंगामासाठी बँक, सोसायट्या कर्ज देणार नसल्याने शेती करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. जुलै २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये चिमूर तालुक्यातील २३ हजार २४३ तर आॅगस्ट २०१३ मधील पुरामुळे ४ हजार ५१४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून आलेल्या आर्थिक मदतीत आॅगस्ट २०१३ चे अनुदान वाटप सुरु आहे. काही जुलै महिन्यांतील वाटप करीत उर्वरित रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली. परंतु याच महिन्यातील ३ हजार २७८ लाभार्थी अनुदानाची वाट बघत आहे. आॅगस्ट महिन्यात ४ हजार ५१४ लाभार्थ्यांपैकी १ कोटी ६७ लाख ७८ हजार ६७५ रुपये अनुदान ३ हजार ९७५ लाभार्थ्यांना देण्यात आले. तर उर्वरित लाभार्थ्यांना वाटप सुरु असल्याचे केवळ सांगितल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
विहिरींचा बांधकाम निधी बेपत्ता
चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील शेतकरी काशिनाथ गजभिये यांना शासनाकडून सिंचन विहिर मंजूर झाली. विहिरीचे बांधकाम सुद्धा सुरु करण्यात आले. परंतु मागील दहा महिन्यांपासून निधी मिळाला नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहे. निधी उपलब्ध करून न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पीक विमा मिळालाच नाही
सन २०१४-१५ या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला मात्र शेतकऱ्यांना पिक विमा मिळालाच नसल्याचा आरोप होत आहे. नागभीड तालुक्यातील शेतकरी ईश्वर अमृतकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी संबंधितांना निवेदन देऊन पिक विमा देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, पिक विम्याचा पहिला हप्ता २६ जानेवारीच्या आत देण्याचे शासनाचे आदेश आहे. तर दुसरा हप्ता १० मार्चपूर्वी देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमान मिळालाच नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.