गणवेशाला निधीची प्रतीक्षा

By Admin | Updated: June 11, 2015 01:22 IST2015-06-11T01:22:11+5:302015-06-11T01:22:11+5:30

शाळेच्या नवीन सत्राला २६ जूनपासून प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि शासकीय आश्रमशाळांच्या तब्बल एक लाख १२ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे नियोजन सर्वशिक्षा अभियानाने केले आहे.

Waiting for funding for uniforms | गणवेशाला निधीची प्रतीक्षा

गणवेशाला निधीची प्रतीक्षा

चंद्रपूर : शाळेच्या नवीन सत्राला २६ जूनपासून प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि शासकीय आश्रमशाळांच्या तब्बल एक लाख १२ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे नियोजन सर्वशिक्षा अभियानाने केले आहे. मात्र, गणवेशाच्या निधीला अंदाजपत्रकात अद्यापही मंजुरी मिळाली नाही. शाळा सुरू होत असल्याने आता विद्यार्थ्यांच्या गणवेशाला निधीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
जिल्हा परिषद, नगर परिषदांतील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने रोडावत चालली आहे. परिणामी या शाळा ओस पडत चालल्या आहेत. या शाळांत विद्यार्थीसंख्या टिकावी, यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासोबत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके दिली जातात. सर्व मुली, एसटी, एससी समाजाचे मुले आणि बीपीएल पालकांच्या मुलांना दरवर्षी दोन गणवेश देण्याचे नियोजन आहे. गणवेशाला लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे पाठविले जाते. त्यानंतर राज्य सरकार गणवेशाचे अंदाजपत्रक केंद्र सरकारकडे पाठविते. त्यानंतर केंद्र सरकार गणवेशाच्या निधीला मंजुरी देते. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात चार कोटी रुपयांचे गणवेशाचे अंदाजपत्रक सर्वशिक्षा अभियानातंर्गत राज्य सरकारकडे पाठविण्यात आले. राज्याने ते केंद्राकडे लागलीच पाठविले होते. शाळा सुरू होण्यासाठी आता वीस दिवसांचा कालावधी आहे. मात्र, अजूनही गणवेशाच्या बजेटला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सर्वशिक्षा अभियान राबविणाऱ्यांनाही गणवेशाची चिंता लागली आहे. पहिल्या दिवशी गणवेश मिळतील, असे नियोजन या विभागाने करून ठेवले आहे. मात्र, बजेटला अजूनही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी गणवेश मिळण्याची आशा धूसर झाली आहे. दरम्यान, लवकरच गणवेशाचा निधी येणार आहे. अंदाजपत्रकाला एक-दोन दिवसात मंजुरी मिळेल, असे सर्वशिक्षा अभियानाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)
यंदा बसणार भुर्दंड
शाळेला आता सुरुवात होत आहे. सध्या पालक शालोपयोगी वस्तू खरेदीच्या मागे आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणवेश मिळतील, अशी आशा पालक बाळगून आहेत. अजून निधीच मिळाला नसल्याने यंदाही पैसे देऊन गणवेश खरेदी करावे लागणार आहे.

Web Title: Waiting for funding for uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.