भदगा नाला प्रकल्पाला वन जमिनीची प्रतीक्षा

By Admin | Updated: December 2, 2014 23:02 IST2014-12-02T23:02:19+5:302014-12-02T23:02:19+5:30

चिमूर तालुक्यातील १४७० हेक्टर क्षेत्र सिंचीत करणारा भदगा नाला लघु प्रकल्प वनजमीन प्रस्तावाच्या मान्यतेसाठी रखडला आहे. १९८३ ला १६३.३० लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाची

Waiting for the forest land for the Bhadga Nala project | भदगा नाला प्रकल्पाला वन जमिनीची प्रतीक्षा

भदगा नाला प्रकल्पाला वन जमिनीची प्रतीक्षा

संपूर्ण क्षेत्र बफर झोनमध्ये : वनप्रस्ताव मान्यतेअभावी सर्वच कामे बंद
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
चिमूर तालुक्यातील १४७० हेक्टर क्षेत्र सिंचीत करणारा भदगा नाला लघु प्रकल्प वनजमीन प्रस्तावाच्या मान्यतेसाठी रखडला आहे. १९८३ ला १६३.३० लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाची अद्यावत किमंत आजच्या स्थितीत ६७३५.१४ लक्ष रुपयांवर पोहचली आहे. मात्र, वनजमीन संदर्भात तोडगा निघत नसल्याने हा प्रकल्प गेल्या ३० वर्षांपासून रखडलेला आहे.
चिमूर तालुक्यातील तळोधी (नाईक) या गावाजवळील नाल्यावर मोठा भदगा नाला लघु प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ३३०.४८ हेक्टर जमीनीची आवश्यकता आहे. यामध्ये २९९.२७ हेक्टर वनजमीन, १.७१ हेक्टर राजस्व जमीन व २९.५० हेक्टर खाजगी जमीनीची आवश्यकता आहे. मात्र, वनप्रस्तावास अंतीम मान्यता न मिळाल्याने भूसंपादनाची कारवाई थंडबस्त्यात आहे.
या प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र १४७० हेक्टर असून सिंचन क्षमता १७७० हेक्टर आहे. या प्रकल्पामुळे २९९.२७ हेक्टर वनजमीन बाधीत होत असल्याने वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत वनप्रस्ताव मान्यतेअभावी प्रकल्पाची सर्व कामे बंद आहेत. प्रकल्पाच्या वनप्रस्तावअंतर्गत पर्यायी वनीकरणाकरीता ६२३.९२ हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करुन दिले होते. यापैकी ५९८.५४ हेक्टर क्षेत्र (वनक्षेत्राच्या दुप्पट क्षेत्र) पर्यायी वनीकरणाकरीता योग्य असल्याचे प्रमाणपत्र वनविभागाकडून प्राप्त झाले होते. परंतु, त्यानंतर २१.५४ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
त्यामुळे विभागीय कार्यालय व मंडळ कार्यालयाने २०१३ मध्ये पत्रव्यवहार करुन प्रकल्पाकरीता आवश्यक जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापही या प्रकल्पाच्या पर्यायी वनीकरणाकरीता झुडपी जंगल उपलब्ध करुन दिलेले नाही. या प्रकल्पाच्या बुडीतखालील संपुर्ण क्षेत्र व कालव्याखालील ४ गावांचे संपुर्ण क्षेत्र बफर झोनमध्ये समाविष्ठ आहे. त्यामुळे वनप्रस्ताव संदर्भात वरिष्ठ स्तरावरुन निर्णय झालेला नाही. गेल्या तीस वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला असल्याने परिसरातील नागरिकांनाही आपल्या भागात सिंचन प्रकल्प होणार असल्याची कोणतीही माहिती नसल्याची स्थिती आहे.

Web Title: Waiting for the forest land for the Bhadga Nala project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.