उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:39+5:302021-01-14T04:23:39+5:30
विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणी चंद्रपूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी तुळशीनगरात जागा आरक्षित करण्यात आली ...

उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी तुळशीनगरात जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या केंद्रात सुविधा पुरवून केंद्र अद्ययावत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ताेट्यांअभावी पाण्याचा अपवय
चंद्रपूर : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. नगर परिषदेने नळधारकांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावाच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे बसून राहतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रोहित्रामुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी हाेत आहे.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरा
सिंदेवाही : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विविध पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पंचायत समिती स्तरावर सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी मिळाली आहे. पण पदे भरण्यात आली नाहीत. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वर्ग ३ च्या पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.
रस्त्यावरील झुडपे ठरत आहेत जीवघेणे
सावली : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील व्याहाड, अंतरगाव, मुडझा रस्ता, निफंद्रा, डोंगरगाव, बोरखळा, कसरगाव, करोली, मंगरमेंढा बारसागड, मेहा, गेवरा, सायखेडा, पालेबारसा, वीरखल चक, हिरापूर अंतरगाव ते मेहा रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठी झुडपे वाढली आहेत. काही मार्गांवर अपघातही झाले. याबाबत बांधकाम विभागाला कळविण्यात आले. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील झुडपे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा
सिंदेवाही : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पण विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अल्प पावसामुळे खरीप हंगामातील धानाचे पीक वाया गेले होते. उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारत आहेत. प्रशासनाने विम्याची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मानव मिशन योजनेची व्याप्ती वाढवा
भद्रावती : आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थिनींनी बसद्वारे शाळेत जाता यावे, याकरिता मानव मिशन योजना सुरू करण्यात आली. मात्र शाळा सुरू होऊन अद्यापही महामंडळाने बसफेऱ्या सुरू केल्या नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय, विद्यार्थिनींना सायकलसाठी तीन हजार रुपयाची मदत मिळते. मात्र ही मदत तोकडी असल्याने मदत वाढवावी, अशी मागणी होत आहे.
प्लास्टिकबंदी कागदावरच
चंद्रपूर : वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकबंदी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवीत अनेकांवर कारवाई केली. अनेकांकडून दंड वसूल केला. मात्र आता ही मोहीम थंडावली असल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदी केवळ कागदावरच झाल्याचे बोलले जात आहे.
बायोमेट्रिक मशीन बंद, कर्मचारी बिनधास्त
चंद्रपूर : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र यातील अनेक मशीन बंद आहेत, तर कोरोनामुळे बायोमेट्रिकच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी बिनधास्त फिरत आहेत.
मुख्य चाैकातील फलक हटवा
चंद्रपूर : येथील म.गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी आहे.
ट्रॅक्टर चालकांसाठी परवाना शिबिराची गरज
चंद्रपूर : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. पाच वर्षांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारकांसाठी शिबिराची गरज आहे. त्यासाठी आरटीओ विभागाने पुढाकार घ्यावा.